कोल्हापूर | राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता जाताच आघाडीच्या काही नेत्यांवर ईडीचे छापे सुरू झाले आहेत. नव्या वर्षात पहिलीच छापेमारी महाविकास आघाडीचे मोठे नेते कोल्हापूर जिल्ह्यातील माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. मुश्रीफ यांच्या कोल्हापूर आणि पुण्यातील मालमत्तांवर ही छापेमारी केली. सकाळी 6 वाजल्यापासून ही कारवाई सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान हसन मुश्रीफ मुंबईत असल्याने त्यांना माहिती मिळताच ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. यावेळी हसन मुश्रीफ हे दुपारी 1 वाजेपर्यंत आपल्या मुळ निवासस्थानी कागल येथे येऊन पत्रकार परिषद घेणार आहेत. मुश्रीफ यांचे कार्यकर्ते आक्रमक होत असल्याचे चित्र आहे. कार्यकर्त्यांनी पोलीस बंदोबस्त झुगारून मुश्रीफ यांच्या घराकडे जाण्यास सुरवात केली आहे. कार्यकर्ते अधिकच आक्रमक होत असल्याने मुश्रीफ पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान मुश्रीफांच्या घरावर छापे पडताच घटनास्थळी सीआरपीएफचे जवान एके 47 घेऊन हजर झालेत. ही कारवाई झाल्याचे समजताच मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत कागल आणि मुरगुड शहरात बंद पुकारला. तर आता तासाभरात राष्ट्रीय महामार्ग आणि कोल्हापूर बंदची हाक कार्यकर्त्यांनी दिली आहे. कागल, कोल्हापूर आणि जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून कार्यकर्ते मुश्रीफांच्या घराकडे येत असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परंतु कार्यकर्ते पोलिसांच्या बंदोबस्ताला जुमानत नसल्याचे चित्र आहे.


नेमकं प्रकरण काय?
काही महिन्यांपूर्वी भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप केले होतं. २०२० साली आप्पासाहेब नलावडे साखर कारखाना पारदर्शक पद्धतीने व्यवहार न होता ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला चालवण्यासाठी दिला. या कंपनीला साखर कारखाना चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता. मात्र, तरी सुद्धा या कंपनीला कंत्राट दिल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता.