AgricultureMarket

Onion Market 2024 : बाजारसमित्यात कांदा लिलाव दहा दिवसांपासून ठप्प

नाशिक | मार्च २९ पासून बहुतांश बाजार समित्यांच्या मुख्य व उपबाजार आवारात लिलाव (Onion Market 2024) ठप्प आहेत. ४ एप्रिलपासून बाजारात लिलाव पूर्ववत होतील, अशी अपेक्षा होती. मात्र लेव्हीच्या मुद्द्यावर हमाल मापाऱ्यांनी कामकाजात सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर हमाली, तोलाई व वाराई कपात करणार नाही; मात्र कामकाजासाठी तयार आहोत, अशी व्यापाऱ्यांची भूमिका आहे. या दोन्ही भूमिका परस्परविरोधी असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

तीन दिवसांपेक्षा अधिक काळ बाजार समिती कामकाज बंद ठेवता येणार नाही, याबाबत पणन संचालनालयाने पत्र काढून स्पष्ट केले आहे. मात्र असे असताना हमाल, मापाडी व व्यापाऱ्यांच्या भांडणात बाजार समितीची कोंडी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

एकीकडे दोन्ही घटकांच्या मागण्या या न्यायप्रविष्ट असल्याने कामकाज सुरू झालेले नाही. तर दुसरीकडे बाजार समिती व उपबाजारातील आवारात सुट्यांमुळे लिलाव बंद राहत आहेत. यामुळे उन्हाळी कांदा व इतर माल विक्री करता येत नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत. मार्चअखेर विविध सणांमुळे जिल्ह्यातील कांदा बाजार सलग चार दिवस बंद होता. माथाडी कामगारांचे प्रश्‍न, शनिवार, रविवारची सुटी, अमावस्या, गुढीपाडवा आदींमुळे बाजार बंद राहणार आहेत.

एकीकडे लग्नसराई व सणासुदीच्या काळात कौटुंबिक खर्च व आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी शेतकरी आपल्या शेतीमालाची विक्री करतात. मात्र बाजार समित्या बंद असल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी वाढत आहेत. याबाबतीत कुठलाही तोडगा निघत नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.

Back to top button