News

विश्वजीत कदमांनी सोडली विशाल पाटलांची साथ! आघाडीच्या उमेदवारांला निवडून आणण्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांना आदेश! Sangli loksabha Mahavikas Aaghadi

सांगली | लोकसभा निवडणुकीमध्ये सांगलीत काँग्रेसमध्ये विशाल पाटील यांच्या रुपाने बंडखोरी झाल्याने पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढली आहे. त्यातच महाविकास आघाडीत ही जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते संतापले आहेत. विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील अनेक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचे मन वळवत त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे काम करावे यासाठी काँग्रेसने आज सांगलीत मेळावा आयोजित केला होता.

यावेळी आमदार विश्वजीत कदम यांनी, पक्षाची अडचण होत असेल तर कार्यकर्त्यांनी समजून घ्यायला हवे असे सूचक विधान केले. तसेच पक्ष जो आदेश देईल त्या उमेदवाराला निवडून आणू असे सांगत त्यांनी चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात सक्रिय होणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यासाठी लोकसभेची निवडणूक अवघड झाली आहे.

Sangli loksabha Mahavikas Aaghadi: सांगली लोकसभेसाठी काँग्रेसकडून विशाल पाटील यांच्यासाठी प्रयत्नांची शर्थ करूनही निराशा हाती आलेल्या आमदार विश्वजित कदम यांनी आज काँग्रेस मेळाव्यातून आपली भूमिका स्पष्ट केली. विश्वजित कदम म्हणाले की, सांगलीची जागा काँग्रेसकडेच राहील असे आम्हाला सांगितले होते. आम्ही लोकांना सांगत गेलो की यंदा काँग्रेसचाच खासदार असेल.

जागावाटपाची चर्चा सुरू झाल्यानंतर सांगली आणि कोल्हापूरचा संबंध कुठे आला? शाहू महाराज ज्या पक्षाकडून लढतील त्यावर ते लढतील असे ठरले होते. मग सांगलीवर कसा काय हक्क सांगितला? उद्धव ठाकरे सांगलीत आले आणि चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. असं लोकशाहीत होतं का? जागा देऊन चूक केलीच, कोण काय करत होते, याकडे का लक्ष दिलं नाही? अशी थेट विचारणाच विश्वजित कदम यांनी यावेळी केली. 

कदम यांनी सांगितले की, मी विशाल पाटील यांना समजावून सांगितले पण त्यांनी त्यांचा निर्णय घेतला आहे. मी काँग्रेस उमेदवारासाठी प्रयत्न करत होतो. पण आता मला महाविकास आघाडीचा धर्म पाळावा लागणार आहे. तसेच खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेलाही विश्वजीत कदम यांनी यावेळी उत्तर दिले, व यावेळी झालेली चूक विधानसभेला होऊ देणार नसल्याचे सांगितले.

कदम म्हणाले, या निवडणुकीत शिवसेनेला जेवढी मते मिळतील ती सर्व काँग्रेसची असतील आणि त्यामुळे पुन्हा विधानसभेला त्यांनी आवाज करू नये. गेल्या तीन-चार महिन्यांच्या सापशिडीच्या खेळात आम्हाला साप चावला पण अंतिम विजय आमचाच होईल असेही, कदम म्हणाले.

यावेळी काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते बाळासाहेब थोरात यांनी पक्षाच्या कार्याकर्त्यांना आदेश देत ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचे काम करण्याचे आदेश दिले.

Back to top button