News

मनोज जरांगे पाटील यांची पश्चिम महाराष्ट्रात तोफ धडाडणार! Manoj Jarange Patil 

मुंबई | मराठ्यांना आरक्षण मिळाले तर जल्लोष होईल किंवा माझी अंत्ययात्रा निघेल, असा सरकारला इशारा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची तोफ पुणे जिल्ह्यात आज 20 ऑक्टोबर रोजी धडाडणार आहे. यानिमित्त पुन्हा लाखो मराठा तरुण आरक्षणासाठी एकत्र येणार आहेत. पुणे जिल्ह्यातील मनोज जरांगे पाटील यांचा दौरा शिवनेरी किल्ल्यापासून सुरु झाला आहे. त्यानंतर राजगुरुनगर आणि बारामतीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे.

पुणे येथील राजगुरुनगरमध्ये शुक्रवारी सकाळी 11 वाजता मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. या सभेसाठी 100 एकर जागा घेण्यात आली आहे. सभेसाठी भव्य व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. अत्याधुनिक साऊंड सिस्टिम, ठिकठिकाणी एलईडी स्किन, जनरेटरची व्यवस्था असे मोठे नियोजन सभेसाठी करण्यात आले आहे. तीन जनरेटरच्या माध्यमातून सभास्थळी विद्युत पुरवठा केला जात आहे. या ठिकाणी इंटरनेटची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

मंडपाची विनामूल्य सोय

सध्या नवरात्र उत्सव सुरु आहे. त्यासाठी मंडपाला मोठी मागणी आहे. परंतु वैभव कोतवाल यांनी सभेसाठी विनामूल्य मंडप उपलब्ध करुन दिला आहे. सभास्थळी येणाऱ्या मराठा बांधवांसाठी नाश्ता, पाण्याचे नियोजन केले आहे. यासाठी दानशूर व्यक्तींकडून निधी मिळाला आहे. त्यामुळे सर्वांना मोफत नाश्ता, पाणी मिळणार आहे.

मनोज जरांगे पाटील सभेत काय बोलणार?

मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथून सराकारला अल्टीमेटम दिला होता. आता मराठा आरक्षणासाठी फक्त चार दिवसांचा कालावधी राहिला आहे. यामुळे पुणे येथील सभेत मनोज जरांगे पाटील काय बोलणार? याकडे लक्ष लागले आहे. राजगुरुनगरमधील सभेनंतर जरांगे पाटील हे बारामतीत दाखल होणार आहेत.

सभास्थळी 55 रुग्णवाहिका

पुण्याच्या राजगुरुनगर येथे होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभेनिमित्ताने खेड, आंबेगाव, जुन्नर रुग्णवाहिका असोसिएशनतर्फे 55 रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. ऑक्टोबर हिट लक्षात घेऊन रुग्णवाहिकेत व्यवस्था करण्यात आली आहे.

Back to top button