Blog

कशी होते ऑनलाईन फसवणूक? स्कॅमरने स्वतःच सांगितली पद्धत; व्हॉट्सअ‍ॅप चॅट होतंय व्हायरल.. एकदा नक्की पहा | Scammer WhatsApp Chat Viral

आजकाल सर्व व्यवहार मोबाईलवर होत आहेत. त्यामुळे ऑनलाईन फसवणूक होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. वेगवेगळ्या शक्कल लढवून लोकांचे मोबाईल हॅक करण्याचे प्रयत्न सायबर गुन्हेगारांकडून केले जातात. आजकाल यासाठी व्हॉट्सअ‍ॅपची देखील मदत घेण्यात येते. एका स्कॅमरने स्वतःच फसवणूक कशा पध्दतीने केली जाते आणि फसवणूक टाळण्यासाठी (Scammer WhatsApp Chat Viral) काय करावे याबद्दल माहिती दिली आहे.

बंगळुरूमधील चेट्टी अरुण नावाच्या एका व्यक्तीने स्कॅमरशी झालेला आपला संवाद आपल्या एक्स हँडलवरुन शेअर केला आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर झालेल्या या चॅटचे स्क्रीनशॉट्स त्यांनी एक्सवर पोस्ट केले आहेत. चॅटवरील संवादातून समजते की स्कॅमर कशा पध्दतीने स्कॅम करतात आणि ते टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळाव्या. स्कॅमरने गप्पांच्या ओघात याबाबतची सर्व माहिती चेट्टी अरूण यांना सांगितली आहे, तसेच हे चॅट पोलिसांना देऊ नका अशी विनंतीही केली आहे.

स्कॅमर आणि चेट्टी अरूण यांचा संवाद कसा सुरू झाला ?

चेट्टी यांना सुरुवातीला या स्कॅमरने एक APK फाईल पाठवली होती. यानंतर चेट्टींनी सांगितलं, की मी आयफोन वापरतो, आणि APK फाईल ही अँड्रॉईड अ‍ॅप्ससाठी वापरली जाते. यानंतर त्यांनी स्कॅमरला ब्लॉक करण्याऐवजी त्याच्याशी गप्पा मारण्यास सुरुवात केली. गप्पांच्या ओघात अरूण यांनी “मी हे अ‍ॅप डाऊनलोड केलं असतं तर काय झालं असतं?” असं स्कॅमरला विचारलं. त्यावर स्कॅमरने सांगितलं, की त्यानंतर तुमचे सगळे मेसेज मला मिळाले असते. अगदी व्हॉट्सअ‍ॅप मेसेज आणि बँकांचे ओटीपी देखील.

यावर अरुण विचारतात, की तुम्हाला नंबर कुठून मिळतात? तसंच तुमच्याकडे कार्ड डीटेल्स नसतील, तर फक्त ओटीपी घेऊन तुम्ही काय करता? त्यावर स्कॅमर सांगतो, की “एखाद्या व्यक्तीचा नंबर मिळवणे आजकाल अवघड नाही. तसेच, कार्ड डीटेल्स हे फ्लिपकार्ट, फोनपे अशा साईट्सवरुन मिळून जातात. बऱ्याच जणांनी याठिकाणी आपले कार्ड सेव्ह केलेले असतात. ठराविक लिमिटपर्यंत ट्रान्झॅक्शन करण्यासाठी CVVची गरज भासत नाही. केवळ ओटीपी पुरेसा असतो. याचाच फायदा हे स्कॅमर्स घेतात.

फसवणूक कशी टाळायची ?

फसवणूक कशी टाळायची यावर, अशा एपीके फाईल्स डाऊनलोड न करण्याचा सल्ला स्कॅमरने अरूण यांना दिला. तसेच, चुकून अशी फाईल डाऊनलोड झाल्यास फोन रिस्टार्ट करा किंवा सिमकार्ड काढा असे स्कॅमरने सांगितले. तसेच इतरांना देखील हा मेसेज द्या जेणेकरून त्यांचे नुकसान होणार नाही.

यासोबतच स्कॅमर अरुणसोबत खासगी आयुष्याबद्दल देखील गप्पा मारताना या चॅट दिसते. त्याच्या डीपीमध्ये कोण आहे? त्यांचं फेसबुक अकाउंट आहे का? असे प्रश्न तो विचारतो. जेव्हा अरुण यांनी सांगितलं, की हे चॅट्स ते सोशल मीडियावर शेअर करणार आहेत; तेव्हा आपले मेसेज त्याने डिलीट केले, आणि पोलिसांना याबाबत माहिती न देण्याची विनंती अरूण यांना केली.

Back to top button