मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे सोमवारी ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर मोठी गर्दी करण्यात आली आहे.
राज्याच्या सत्तासंघर्षाच्या निकालाच्या दिवशीच जयंत पाटील यांना ईडीकडून नोटीस (ED Notice) पाठवण्यात आली होती. ऐन सत्तासंघर्षाच्या निकाला दिवशीच जयंत पाटील यांना ईडीकडून नोटीस आल्याने या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली आहे. दरम्यान, ईडी चौकशीला हजर राहण्याआधीच जयंत पाटलांनी ट्वीट (Jayant Patil Twitt) केलं आहे.
काय आहे जयंत पाटील यांचे ट्विट
“आज सकाळी ११ वाजता मी ईडी कार्यालयात उपस्थित राहणार आहे. ईडीचे समन्स आल्यापासून मला राज्यभरातून माझ्या पक्षातील व इतर मित्र पक्षांतील पदाधिकाऱ्यांचे फोन येत असून राज्यभरातून लोक आज ईडी कार्यालयाबाहेर येत असल्याचे मला समजत आहे”, असं जयंत पाटील ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.
जयंत पाटील यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लावल्याने त्यांचे समर्थक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. त्यांनी याविरोधात भाजपा आणि ईडीविरोधात आंदोलन पुकारले आहे. कार्यकर्त्यांनी ईडीच्या विरोधात बॅनरबाजी केली आहे. तर मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर मोठी घोषणाबाजी करण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. तर अन्य कार्यकर्ते इस्लामपूर, सांगली येथे ईडी आणि भाजप विरोधात तीव्र आंदोलन करणार आहेत.
संजय राऊत यांचा सरकारला इशारा
या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना सूचक इशारा दिला आहे. विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जात आहे. हे चित्र फारकाळ राहणार नाही. २०२४ साली ईडीच्या कार्यालयात कोणाला पाठवायचं आणि किती वेळ बसवायचे, याच्या याद्या आम्ही लवकरच तयार करु, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.