जळगाव | राज्यात विविध ठिकाणी अंगणवाड्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी भरती सूरू आहे. जळगाव जिल्ह्यात देखील ७९० अंगणवाडी सेविकांची भरती मे अखेरपर्यंत करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेमार्फत ही भरती केली जाणार आहे. त्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या वतीने परीक्षा घेतली जाणार आहे. या भरतीमुळे अनेक महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
नुकतेच राज्यातील अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मानधनात भरघोस वाढ करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. आशा स्वयंसेविकांना ३५०० वरून पाच हजार मानधन करण्यात आले आहे तर गटप्रवर्तकांना आता ४७०० ऐवजी ६२०० रुपये मानधन मिळेल.
अंगणवाडी सेविकांचे मानधन ८३२५ वरून १० हजार रुपये करण्यात आले आहे. मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन ५ हजार ९७५ वरून ७ हजार २०० रुपये करण्यात आले आहे. अंगणवाडी मदतनिसांचे मानधनही ४ हजार ४२५ वरून ५ हजार ५०० रुपये करण्यात आले आहे.