मुंबई | देशातील मोठी आयटी कंपनी असलेल्या Infosys ने फ्रेशर्सना कामावर घेण्याचा सपाटा लावला आहे. Infosys कंपनीने तिसऱ्या तिमाहीत एकूण तब्बल 6000 फ्रेशर्सना (Infosys Job Opportunities) कामावर रुजू केले आहे. तर 2023 हे आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी कंपनी एकूण 50 हजार फ्रेशर्सना कामावर रुजू करून घेणार आहे.
इन्फोसिसचे मुख्य वित्तीय अधिकारी निलांजन रॉय यांनी कंपनीच्या फ्रेशर्सना रुजू करण्याच्या धोरणाबाबत माहिती दिली आहे. 2023 हे आर्थिक वर्ष संपेपर्यंत आम्ही आमचे 50 हजार फ्रेशर्सना रुजू करण्याच्या ध्येयापर्यंत पोहोचू असे रॉय यांनी सांगितले आहे.
सध्या इन्फोसिस मध्ये अनेक नव्याने रुजू झालेले फ्रेशर्स म्हैसूर येथे प्रशिक्षण घेत आहेत. उद्या हेच फ्रेशर्स कंपनीला पुढे घेऊन जातील असा आम्हाला विश्वास आहे. आम्ही फ्रेशर्सला चांगल्या दर्जाचं प्रशिक्षण देऊन तयार करत आहोत. आम्ही असं समजतो कि आम्ही हि एक प्रकारची भविष्यासाठी गुंतवणूक करत आहोत असं मत नीलांजन रॉय यांनी व्यक्त केले.
दरम्यान, Infosys ने या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 21,171 लोकांची भरती केली होती. त्यानंतर Q2 मध्ये निम्म्याहून अधिक लोकांची भरती कमी करून 10,032 जणांची तर Q3 मध्ये कंपनीने केवळ 1,627 जणांची नव्याने भरती केली होती. मात्र आता कंपनीने 6000 फ्रेशर्सना कामावर घेऊन 40 हजार फ्रेशर्सला कामावर घेण्याचा टप्पा गाठला आहे. जगभरात मंदीचे सावट असताना इन्फोसिसने केलेल्या या भरतीमुळे IT क्षेत्रात एक वेगळे वातावरण निर्माण झाले आहे.