अवघ्या 10वर्षात आम आदमी पक्ष होणार ‘राष्ट्रीय पक्ष’..! ‘आप’ला होणार ‘हे’ फायदे 

मुंबई | गुजरात विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने 5 जागांवर विजय मिळवला आहे. भाजप आणि काँग्रेसनंतर तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवलेल्या ‘आप’ला मतांची टक्केवारी मात्र लाभदायक ठरलीय. कारण या मतांच्या टक्केवारीवरच ‘आप’चा राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू होऊन दोन तास उलटताच, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांनी ट्वीट करत म्हटलं – “गुजरातच्या जनतेनं आपल्या मतांनी आम आदमी पक्षाला आज राष्ट्रीय पक्ष बनवला. शिक्षण आणि आरोग्याचं राजकारण पहिल्यांदा राष्ट्रीय राजकारणात जागा घेत आहे. संपूर्ण देशाचं अभिनंदन.”

यामुळे काँग्रेस आणि भाजपच्या रांगेत राष्ट्रीय स्तरावर आता अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचही स्थान निश्चित होणार आहे. आम आदमी पक्षाला ‘राष्ट्रीय पक्ष’ म्हणून मान्यता मिळाल्यास त्याचा मोठा फायदा पक्षाला होणार आहे.

राष्ट्रीय दर्जा मिळवण्यासाठी तीन महत्त्वाच्या अटी

एखाद्या पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळवण्यासाठी निवडणूक आयोगानं घालून दिलेल्या तीन महत्त्वाच्या अटींची पूर्तता करावी लागते, तेव्हाच त्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा बहाल केला जातो.

  • लोकसभेतील किमान 2 टक्के जागा पक्षानं तीन वेगवेगळ्या राज्यांमधून जिंकलेल्या असाव्यात.
  • लोकसभेत 4 खासदार असावेत. शिवाय, 4 राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत किमान 6 टक्के मतं मिळेलेली असावीत.
  • किमान 4 राज्यांमध्ये पक्षाला राज्य पक्षाचा दर्जा असावा.

या तीनपैकी एका निकषाची पूर्तता केली, तरी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो.

यातील दुसऱ्या निकषांची म्हणजे किमान 6 टक्के मतांची अट आम आदमी पक्षांने गुजरातमध्ये पूर्ण केली आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाचा ‘राष्ट्रीय पक्ष’ बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दिल्ली, पंजाब, गोव्यानंतर आता गुजरात या चौथ्या राज्यात वैध मतांपैकी सहा टक्क्यांहून अधिक मते आम आदमी पक्षानं मिळविली आहेत.

भारतीय जनता पार्टी, इंडियन नॅशनल काँग्रेस, बहुजन समाज पार्टी, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया – मार्क्सिस्ट, नॅशनल पिपल्स पार्टी आणि नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी अशा सात पक्षांची ‘राष्ट्रीय पक्ष’ म्हणून नोंद आहे. आता आम आदमी पक्षांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या यादीत त्यांचंही नाव जोडलं जाईल आणि ‘आप’ भारतातील 8 वा राष्ट्रीय पक्ष बनेल.

राष्ट्रीय पक्ष झाल्यानं ‘आप’ला काय फायदा होणार?

  • एखाद्या पक्षाला ‘राष्ट्रीय पक्ष’ म्हणून दर्जा मिळाल्यानंतर त्याला काही फायदेसुद्धा मिळतात. सर्वात मोठा फायदा म्हणजे, ‘राष्ट्रीय पक्ष’ म्हणून मान्यता असलेल्या पक्षाला देशभरात कुठेही निवडणूक लढवताना एकच चिन्ह राखीव मिळतं.
  • राष्ट्रीय दर्जा मिळालेल्या पक्षाला निवडणूक आयोग मतदारांची अपडेटेड यादी निवडणुकांपूर्वी पुरवतं, तसंच या पक्षाच्या नेत्यांना उमेदवारी अर्ज भरताना एकाच अनुमोदकाची आवश्यकता असते.
  • या पक्षाला रेडिओ आणि दूरदर्शनवर प्रक्षेपणाची सोय पुरवली जाते.
  • राष्ट्रीय पक्षाला स्टार प्रचारकांची यादी वेगळ्याने काढण्याची मुभा असते. या यादीत जास्तीत जास्त 40 नेत्यांचा समावेश केला जाऊ शकतो आणि या प्रचारकांच्या प्रवासाचा खर्च उमेदवारांच्या प्रचारासाठीच्या खर्चात मोजला जात नाही.
  • पक्षाच्या कार्यालयासाठी सरकारकडून सवलतीच्या दरात जमीन मिळवता येते.