हिमाचल प्रदेशात भाजपचा पराभव, काँग्रेसचा सर्वाधिक ४० जागांसह दणदणीत विजय

मुंबई | हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला असून काँग्रेसच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. मागील निवडणुकीत भाजपाने ६८ पैकी ४४ जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली होती. तर काँग्रेसला केवळ २१ जागा जिंकता आल्या होत्या.

काँग्रेसचा सर्वाधिक ४० जागांसह दणदणीत विजय

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी संपली आहे. या निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय झाला आहे. काँग्रेसला सर्वाधिक ४० जागा मिळाल्या आहेत. तर, भाजपाची सत्ता खालसा झाली असून, २५ जागांवर समाधान मानवं लागलं आहे. अपक्षांना ३ जागा मिळाल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होत. येथे विधानसभेच्या ६८ जागांसाठी ४१२ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीसाठी १२ नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात ७५.६ टक्के मतदान झाले होते. या राज्यात प्रत्येक पाच वर्षांत सत्ताबदल होतो. हीच परंपरा यावेळीही कायम राहिली आहे. येथे काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला असून सत्ताधारी भाजपला सत्तेतून खाली खेचलं आहे.

UPDATE

18:18 (IST) 8 Dec 2022 – “काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली हिमाचल प्रदेशची निवडणूक हा पहिला विजय आहे. तेथील जनतेने पुन्हा काँग्रेसवर विश्वास टाकला आहे. मात्र, भाजपाची अलिकडील राजकारण पाहून घोडे बाजाराची शक्यता नाकारता येणार नाही,” अशी प्रतिक्रिया छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दिली.

16:24 (IST) 8 Dec 2022 – काँग्रेस पक्ष हिमाचल प्रदेशमध्ये विजयाच्या जवळ जाऊन पोहोचला आहे. आतापर्यंत या पक्षाचा एकूण २९ जागांवरविजय झाला आहे. बहुमताच आकडा पार करण्यासाठी काँग्रेसला आणखी ६ जागांवर विजय आवश्यक आहे. काँग्रेस पक्ष येथे १० जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपाचा आतापर्यंत १६ जागांवर विजय झाला आहे. भाजपा आणखी १० जागांवर आघाडीवर आहे.

14:37 (IST) 8 Dec 2022 – हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस सध्या आघाडीवर आहे. येथे काँग्रेसचा आतापर्यंत ९ जागांवर विजय झाला आहे. तर काँग्रेस ३० जागांवर आघाडीवर आहे. भाजपाचा ९ जागांवर विजय झाला असून १७ जागांवर भाजपा आघाडीवर आहे.

08:36 (IST) 8 Dec 2022 – हिमाचल प्रदेशमध्ये भाजपा पिछाडीवर आहे. सध्या काँग्रेस २३ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपा २१ जागांवर पुढे आहे. तर अपक्ष ३ जागांवर पुढे आहेत.

08:05 (IST) 8 Dec 2022 – हिमाचल प्रदेशमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. वेगवेगळ्या कार्यालयांत निवडणूक अधिकारी मतमोजणी करत आहेत. काही क्षणांत पहिला निकाल हाती येणार आहे.