राज्यपाल पुन्हा वादात! छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, मिटकरींनी ट्विट केला भाषणाचा Video

मुंबई | मागच्या काही दिवसांपासून महापुरुषांबाबत केलेल्या विधानांमुळे अडचणीत आलेले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. मुंबईतल्या एका कार्यक्रमात बोलताना राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी कोश्यारींच्या या वक्तव्याचा व्हिडिओ ट्वीट केला असून आहे. आता तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत खुलासा करतील का? असा सवाल केला आहे.

‘राज्यपाल महोदयांकडून मुंबई येथे राजभवनातील कार्यक्रमात परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरुषांचा एकेरी उल्लेख ! नेमके राज्यपालांच्या मनात चाललंय तरी काय ? आता तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत खुलासा करतील का?’, असा सवाल अमोल मिटकरी यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना हा व्हीडीओ ट्विट करत विचारला आहे.

याच कार्यक्रमात बोलताना पुढे राज्यपाल कोश्यारी यांनी आणखी एक वक्तव्य केल्याने, त्यांना उत्तराखंडमध्ये परतण्याचे वेध लागले आहेत का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. राज्यपाल बनणं म्हणजे सर्व दु:खच दु:ख आहे, सुख काहीच नाही, असं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विधान केलं आहे.

‘राज्यपाल बनने से दुख ही दुख है, सुख तो कुछ भी नहीं है. मात्र अशी लोकं येतात तेव्हा कधी कधी बरं वाटतं. मी आता 80 वर्षांचा झालोय, त्यामुळे मी तर काही आता मुमुक्षरत्न नाही बनू शकत. अशा लोकांजवळ येतो तेव्हा त्यांचा सुगंधही लागतो. जैन तीर्थ सर्कीट बनवलंय. सरकारला आवाहन आहे, पर्यटन मंत्रायलासोबतच तीर्थक्षेत्राचं मंत्रालयही व्हावं. सर्वच मुमूक्षू, मुनी राज्यपाल बनू शकत नाहीत,’ असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं.