मुंबई | मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषण करीत आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज (2 नोव्हेंबर) नववा दिवस आहे. सरकारला दिलेल्या इशाऱ्यानुसार त्यांनी पाणी पिणे बंद केलं आहे. त्यामुळे त्यांची तब्येत खालावली आहे. आज ( 2 नोव्हेंबर) ते काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेची भेट घेणार
आज (2 नोव्हेंबर) 12 वाजता राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचं एक शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत पोहोचणार आहे. कालच्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीतील ठरावांची प्रत यावेळी जरांगे पाटील यांना देण्यात येणार आहे. तसेच मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी आणखी वेळ द्यावा, आणि उपोषण सोडावे अशी मागणी शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे. या शिष्टमंडळात अतुल सावे, संदिपान भुमरे आणि नारायण कुचे यांचा समावेश असेल.
काल 1 नोव्हेंबरला मुंबईत झालेल्या सर्व पक्षीय नेत्यांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना उपोषण मागे घ्या, सरकारला आरक्षणाच्या बाबतीत थोडा वेळ द्या असं आवाहन केलं होतं. पण जरांगे पाटील आपल्या उपोषणावर ठाम असून त्यांनी काल संध्याकाळपासून पाण्याचा देखील त्याग केला आहे.
1 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषदेत जरांगे काय म्हणाले?
बुधवारी (1 नोव्हेंबर) संध्याकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांनी आरक्षण मिळेपर्यंत पाण्याला हात लावणार नसल्याचे म्हटलं आहे. ते म्हणाले की, “आमचा नाईलाज आहे, आम्हाला कठोर लढावं लागेल. होणाऱ्या सगळ्या प्रकाराची जबाबदारी सरकारवर राहिलं. सरकार जाणूनबुजून गुन्हे दाखल करत आहे. वकील बांधवांनी आपल्या मराठा बांधवांसोबत उभं राहावं.”
यावेळी त्यांनी सरकावर गंभीर आरोप देखील केलेत. मराठे शांततेत आंदोलन करणार आहेत. मात्र सरकारच वातावरण दूषित करीत आहे. ‘मला कधीपर्यंत बोलता येईल, आणि कधी माझं बोलणं एकदम थांबेल हे आता सांगता येणार नाही,’ असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
दरम्यान, जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितलं की, “जिल्ह्यातील परिस्थिती सध्या शांततापूर्ण आहे. आम्ही मनोज जरांगे आणि त्यांच्या टीमच्या संपर्कात आहोत. अफवा पसरत असल्याने इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. बीड हा शेजारचा जिल्हा आहे. बीडमधील हिंसाचाराची व्हीडिओ क्लिप आणि इतर गोष्टी व्हायरल झाल्या की चुकीचा संदेश जातो. जिल्ह्यात कर्फ्यू लागू नाही. कोणत्याही आंदोलनाला बंदी नाही, पण हिंसक निदर्शनास परवानगी नाही, त्यावर कारवाई केली जाईल. जिल्ह्यात अतिरिक्त फौजफाटा मागवण्यात आला आहे.” असेही बलकवडे यांनी सांगितले.