Monsoon Update २०२४ : हवामान विभागाने काही दिवसांपूर्वी मान्सूनबाबत अपडेट दिली होती. आता आणखी एक नवीन अपडेट दिली आहे. यावर्षी मान्सूनची सुरूवात लवकर होऊ शकते असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान विभागाने केरळमध्ये ३१ मे च्या सुमारास मान्सून सुरू होण्याची शक्यता वर्तवली आहे.
यामुळे मान्सूनची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना चांगला दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षी मान्सून ४ जूनला केरळात दाखल होण्याचा अंदाज होतो. परंतु त्याची वाटचाल लांबली होती. गेल्या वर्षी ८ जूनला मान्सून केरळमध्ये आला होता. यापूर्वी २०२२ मध्ये २९ मे, २०२१ मध्ये ३ जून, २०२० मध्ये १ जून, तर २०१९ मध्ये ८ जून रोजी मान्सून केरळात दाखल झाला होता.
Monsoon Update 2024: नैऋत्य मान्सून साधारणपणे १ जूनपर्यंत केरळमध्ये येतो आणि त्याचे प्रमाण साधारण ७ दिवसांचे असते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यंदाचा नैऋत्य मान्सून ३१ तारखेच्या सुमारास केरळमध्ये दाखल होऊ शकतो. चार दिवस कमी किंवा चार दिवस जास्त असा फरक असू शकतो. ही तारीख देशभरातील मान्सूनसाठी महत्त्वपूर्ण सूचक म्हणून काम करते.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १९ मे रोजी मान्सून अंदमान निकोबारमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. दरवर्षी साधारणपणे २० ते २२ मे च्या सुमारास मान्सून या झोनमध्ये प्रवेश करतो. येथे पोहोचल्यानंतर मान्सून देशाच्या इतर भागांकडे सरकतो. देशात अल निनो हवामान प्रणाली कमकुवत होत आहे. ‘ला निना’ परिस्थिती सक्रिय होत आहे. तसेच यंदा मान्सून चांगला होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे वेळेपूर्वीच मान्सून भारतात येऊ शकतो, असंही हवामान विभागाने सांगितलं आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, गुरुवारी आसाम, मेघालय, त्रिपुरा, उप-हिमालय पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये उष्ण आणि दमट हवामान अपेक्षित आहे. पुढील चार दिवसांत, वायव्य आणि पूर्व भारतातील अनेक भागांमध्ये कमाल तापमानात सुमारे ३-४ अंश सेल्सिअसने, मध्य भारत आणि गुजरातमध्ये सुमारे २-४ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.
गुरुवारपासून उत्तर-पश्चिम भारतात आणि १८ मेपासून पूर्व भारतात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पश्चिम राजस्थान, पंजाब, दक्षिण हरियाणा, पूर्व राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहार, गुजरातच्या वेगळ्या भागात १६-१९ मे पर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. १५-१६ मे रोजी कोकणात, १६-१७ मे रोजी सौराष्ट्र आणि कच्छ, १८-१९ मे रोजी दिल्ली, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.