कोल्हापूर | महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत कोल्हापूर शहरात दरवर्षी ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ योजना अंतर्गत विविध फल महोत्सवांचे आयोजन करण्यात येत असते. विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थांची संख्या कमी करून, शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा शेतमाल मिळावा हा या महोत्सवांचा प्रमुख उद्देश असतो.
Mango Festival 2024: महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, विभागीय कार्यालय, कोल्हापूर मार्फत दि. 19 ते 23 मे 2024 या कालावधीमध्ये ‘कोल्हापूर आंबा महोत्सव 2024’ चे ‘भारत हौसिंग सोसायटी हॉल, राजारामपुरी, कोल्हापूर’ येथे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर आंबा महोत्सवाचे उद्घाटन रविवार दि. 19 मे रोजी सकाळी 11. 00 वा. मा. श्री. अमोल येडगे सो. (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांचे शुभहस्ते करण्यात येणार आहे.
महोत्सवामध्ये रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, पायरी केसर व इतर विविध जातीचे आंबा उत्पादक शेतकरी सहभागी होणार आहेत. महोत्सवामध्ये आंबा उत्पादकांना 30 स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ग्राहकांना भौगोलिक मानांकन प्राप्त कोकणातील अस्सल हापूस आंबा उत्पादकांकडुन आंबा उपलब्ध होणार आहे. सदर आंबा महोत्सवामध्ये ग्राहकांना आंब्याच्या विविध जाती माहीत होण्यासाठी राज्यातील आंब्याचे प्रदर्शन ठेवण्यात येणार आहे. महोत्सवाची वेळ सकाळी 9 ते रात्री 9 असणार आहे.
सदर उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन सुनील फुलारी, विशेष पोलिस महानिरीक्षक कोल्हापूर, मा. श्री. अरुण काकडे, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर, मा. श्री. निळकंठ करे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर, मा. श्री. बसवराज बिराजदार, विभागीय कृषि सहसंचालक, मा. श्री. अरुण भिंगारदिवे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, कोल्हापूर, मा. श्री. आषुतोष जाधव, महाव्यवस्थापक, नाबार्ड, कोल्हापूर, मा. श्री. उमेश घुले, उपायुक्त, समाजकल्याण, कोल्हापूर, मा. श्री. गणेश गोडसे, व्यवस्थापक हे उपस्थित राहणार आहेत.
सदर उद्घाटन कार्यक्रमास करवीरवासियांनी उपस्थित राहुन आंबा महोत्सवास भेट देण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी केले आहे.