Blog

दहा पंधरा मिनीट झाली की त्यांना गुदमरायला होतं; पाणी..भुयार आणि कोल्हापूर! Water subway and Kolhapur

कोल्हापूर | दहा पंधरा मिनीट झाली की त्यांना गुदमरायला होतं. ते चॅनेलच्या बाहेर येतात. चॅनेल कसलं दगडी भुयारच ते. हे भुयार म्हणजे कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बालिंगा उपसा केंद्राचं दगडी चॅनेल. १९४६ साली भोगावती नदीच्या पात्रात बांधलेलं. २०१९ साली या चॅनेलचे दगड आतल्या आत कोसळले. अर्थात त्यामुळे जॅकवेलमध्ये पाणी तटत, तटत येत राहिलं….

पण एखादी अडचण नरड्यापर्यंत आल्यावर जागं व्हायची आपल्या महापालिकेची पद्धत. आणि त्यामुळचं चार दिवसापुर्वी चॅनेलमधले दगड काढायचं काम सुरु झालं. अर्थात त्यासाठी शहराच्या निम्म्या भागाचा पाणी पुरवठा बंद ठेवला गेला. भुयारातले दगड काढण्याचे काम आव्हानात्मक. मग दानोळीच्य भोसले कॉन्ट्रॅक्टरनी आपली माणसे दिली. हे काम खूप अवघड. दगडी भुयारात जाऊन आत पडलेले दगड बाजुला करणे व पाण्याला वाट करून देणे. दानोळीची ही पोरं आत भुयारात डोक्याला बॅटरी लावुन घुसली. पण ती आत काही वेळाने गुदमरतात. मग थोड्या थोड्या वेळाने बाहेर येऊन मोकळा श्वास घेतात.

भुयाराबाहेर महापालिकेचे जलअभियंता नेत्रदीप सरनोबत व त्यांचे सहकारी बसुन आहेत. भुयारात आत पुन्हा काय ढासळलं तर? या चिंतेत आहेत. त्यात दिवाळी पाच सहा दिवसांवर आलीय. त्या दिवशी नव्या थेट पाईप लाईनचं पाणी येणं कठीण आहे, आणि आता सुरु आहे ते काम तोवर पूर्ण झाले नाही, दिवाळीदिवशी पाणी आले नाही तर ऐन दिवाळीत शहरात काय होईल याची कल्पना करणेही त्यांना अशक्य आहे. पण रात्रंदिवस प्रयत्न सुरु आहेत.

एवढी बिकट वेळ येईपर्यंत महापालिका झोपली होती काय? हाच प्रत्येक कोल्हापूरकरांच्या मनातला या क्षणीचा प्रश्न आहे. अर्थात येत्या दोन दिवसात पाणी येणार नाही हे देखील स्पष्ट आहे. बॅरेल, टाक्या, घागरी, पातेली, डेचक्या, बादल्या कोरड्या ठणठणीत आहेत.

कोल्हापुरातलं घर आणि घर पाण्यासाठी धावाधाव करत आहे. हे काम लवकर व्हावं. पाणी सुरु व्हावं हीच सर्वांची भावना आहे. पण एवढ मात्र खरं की, पाणी ज्या क्षणी येईल त्या क्षणी भुयारात पाच सहा दिवस राबलेल्या व पाणी सुरु केलेल्या त्या सर्व कर्मचाऱ्यांचे जेवढे धन्यवाद मानता येईल तेवढे ते थोडेच असणार आहेत…

Back to top button