फेसबुक जगतात सध्या ‘सप्तपर्णी’ वृक्ष हटावची चळवळ सुरु आहे, त्या निमित्ताने… Saptaparni Tree
सप्तपर्णी उर्फ सातविण वृक्षांची कत्तल करुन हे विषारी वृक्ष संपवा असा विषारी प्रचार सुरु आहे. वास्तविक यात Saptaparni Tree चा काहीच दोष नाही. मात्र हिटलरने जसा ज्यूंचा वंशविच्छेद केला तसा सप्तपर्णीचा वंशविच्छेद करावा म्हणून एक व्यापक चळवळ आकारास येत असल्याचे पाहिले.
साहजिकच सप्तपर्णीला नीच ठरवण्यासाठी हे वृक्ष विदेशी वनस्पती असून, अत्यंत विषारी आहेत. सप्तपर्णी अत्यंत विषारी वायु उत्सर्जित करते. सप्तपर्णीने उत्सर्जित केलेले वायू मानवी शरीरात श्वासाव्दारे गेल्यास उलटी, मळमळ, डोकेदुखी होते. तसेच यामुळे अल्सर व कॅन्सर सारखे गंभीर आजार होतात. या झाडावर कोणताही प्राणी वा पक्षी रहात नाही वगैरे वगैरे मिथके पसरवली जात आहेत.
वास्तविक सप्तपर्णी पश्चिम बंगाल या राज्याचा ‘राज्य वृक्ष’ असून कोणताही विषारी वायू सोडत नाही. या वनस्पतीमध्ये अनेक रासायनिक घटक असून त्यापैकी ३ मुख्य रासायनिक घटक Ditamine, Echitenine, Echitamine आहेत. जे अल्कलाइड आहेत. शिवाय सप्तपर्णीच्या झाडावर बुलबुल पक्षी घरटी करतो. सप्तपर्णीचा आयुर्वेदीक उपयोग केला जातो. मलेरिया, अल्सर, अस्थमा, सर्पदंश, त्वचारोग, बेरीबेरी अशा आजरांवर सप्तपर्णी वापरतात. या झाडाच्या खोडापासून पेन्सिल, शवपेट्या तयार केल्या जातात.
सप्तपर्णी हे अस्सल भारतीय वंशाचे झाड आहे. Alstonia Scholaris हे त्याचे शास्त्रीय नाव आहे. सप्तपर्णी हे संस्कृत नाव असून सातविण हे नाव कोकणी बोलीभाषेत दिले गेले आहे. याचाच अपभ्रंश होवून सांतान, सातीण असंही काही ठिकाणी म्हटले जाते. हिंदीत सप्तपर्णीला ‘चेतून’ म्हणतात. बंगालीत ‘छत्तिम’ म्हणतात. स्कॉटलंडच्या एडिंबरा विद्यापीठातील वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा. अल्स्टोन यांनी सप्तपर्णीवर अभ्यास करुन त्याचे डॉक्युमेंटेशन केलेय. भारतात आयुर्वेदात पंचकर्म शुद्धीसाठी सप्तपर्णी खोडाची साल वापरली जाते.
सप्तपर्णी शरद ऋतूत फुलते. गंमत म्हणजे या झाडाच्या फुलांना दिवसा वास येत नाही, सायंकाळी ७ नंतर उग्र वास सुटतो. रविंद्रनाथ टागोर यांचे सप्तपर्णी अतिशय आवडते झाड होते. विश्वभारती विद्यापीठाच्या आवारात सप्तपर्णीची खूप मोठी झाडे आहेत. पूर्वी विश्वभारती विद्यापीठात पदवीदान समारंभाच्या वेळी सप्तपर्णीची पाने वा छोटी फांदी दिली जात होती.
सप्तपर्णीच्या खोडाची साल जुलाब, मलेरियातील ताप, फीट, त्वचेचे विकार, सर्पदंश इत्यादी बरे करण्यासाठी केला जातो. शिवाय दातदुखी, सांधेदुखी, मधुमेह यासाठी साल वापरतात. खोडातून येणारा पांढरा चीक अल्सर बरा करण्यासाठी वापरला जातो. या झाडाच्या सालीच्या चूर्णाचा वापर भारवी फार्मास्यूटिकलस् या औषध कंपनीने सिंकोना कंपाउंड टॅबलेट (Cinchona Compound Tablet) या त्यांचे उत्पादनामधे केलेला आहे.
सप्तपर्णीचा सुगंध भलेही थोडा उग्र असला तरी तो फार तर आठवडाभर टिकतो. त्यानंतर फुले गळून पडतात व शेंगांचे गुच्छ लगडलेले दिसतात. जर तुम्हाला श्वसनाचे विकार असतील तर मात्र उग्र वासामुळे त्रास होवू शकतो. विशेषत: दमा व अस्थमा असणाऱ्या रुग्णांना त्रास होतो.
थोडक्यात सप्तपर्णी हे झाड विषारी नसून गुणकारी आहे. विविध प्रकारच्या किडी व पतंगासाठी हे झाड आवडीचे असते. सप्तपर्णीच्या वासामुळे कुठलेही गंभीर आजार होत नाहीत. फेसबुक, वॉटसअपच्या माध्यमातून चुकीची माहिती देवून लोकांची दिशाभूल केली जात आहे.
आपण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे येडछाप लोकप्रतिनिधी निवडून दिलेत ते आणि लाच देवून अधिकारी झालेले मेरीटधारी कसलाही अभ्यास न करता, केवळ वर्षभर हिरवे दिसतात म्हणून सगळीकडे एकसारखे सप्तपर्णी लावत सुटलेत. जास्त झाडे एकत्र असतील तर बहराच्या काळात अतिउग्र वास येणे स्वाभाविक आहे.
त्यामुळे सप्तपर्णीच्या वंशविच्छेदाची भूमिका अतिशय उथळ आहे. सप्तपर्णी वृक्ष तोडणे चुकीचे आहे. निवडणूकीत दारु, मटण काही पैसै व आपला जातवाला म्हणून येडगांडे लोकप्रतिनिधी निवडून दिल्यावर ते सुमार कामगिरी करणार आणि हातात किबोर्ड आहे म्हणून निसर्गावरच चढायला आपण मोकळे होणार.