मुंबई | देशात मागील खरिपात तूर उत्पादनात मोठी घट झाल्याने तुटवडा निर्माण झाला होता. तूर पिकावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने ही घट झाली होती. त्यामुळे बाजारात आवक कमी असल्याने मागील सहा महिन्यांपासून देशातील बाजारात तुरीचे भाव तेजीत आहेत.
चालू हंगामात देशात तुरीची लागवड घटली आहे. तर कमी पाऊस, पावसातील मोठे खंड आणि उष्णतेमुळे उत्पादकता कमीच राहण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आणखी वर्षभर तूरीच्या दरात तेजीच राहणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
Tur Market Update
मागील हंगामात देशात तूर पिकावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादकता घटली होती. मागील हंगामात (2022-23) च्या हंगामात देशात फक्त 33 लाख टन तूर उत्पादन झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. तर देशातील तूरीची गरज 45 लाख टनांच्या आसपास आहे. देशात 2021-22 च्या हंगामात 42 लाख 20 हजार टन तूरीचे उत्पादन झाले होते.
यामुळे तूरीच्या मागणी आणि पुरवठ्यात तब्बल 12 लाख टनांची तूट होती. आयातीचा विचार करता 9 लाख टनांच्या दरम्यान आयात होण्याची शक्यता आहे. अर्थातच आयातीनंतरही देशातील मागणी पूर्ण होऊ शकणार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच तुरीचे भाव तेजीत राहणार असल्याचा अंदाज आहे.
मागील हंगामातील राज्यनिहाय उत्पादनाचा विचार करता महाराष्ट्रात सर्वाधिक साडेतीन लाख टनांनी उत्पादन कमी झाले आहे. 2021-22 च्या हंगामात 13.91 लाख टन तूर उत्पादन झाले होते. ते मागील हंगामात 9 लाख 25 हजार टनांवरच स्थिरावल्याचे पहायला मिळाले. कर्नाटकात देखील तूरीचे उत्पादन 11 लाख 45 हजार टनांवरून कमी होऊन 8 लाख 55 हजार टनांवर आले आहे. तर गुजरातमधील उत्पादन 12 हजार टनांनी तर झारखंडमधील उत्पादन 55 हजार टनांनी घटले आहे.