आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे, त्यांचे भविष्य चांगले असावे, असे प्रत्येक आई-वडिलांना वाटते. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने खास मुलींच्या शिक्षणासाठी आणि त्यांना स्वावलंबी करण्यासाठी २०१५ मध्ये ‘सुकन्या समृद्धी योजना’ (Sukanya Samriddhi Yojana) सुरू केली आहे. या योजनेत मुलींचे पालक मुलींच्या नावाने खाते उघडू शकतात आणि त्यात मुलीच्या भविष्यासाठी दरवर्षी गुंतवणूक करू शकतात. मुलींच्या जन्मापासून ते ती मुलगी दहा वर्षांची होईपर्यंत कधीही खाते उघडता येते आणि दरवर्षी त्या खात्यात पैसे जमा करता येतात. जर तुम्ही जन्मापासून सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करायला सुरुवात केली, तर तुमची मुलगी २१ वर्षांची होईपर्यंत तिच्यासाठी चांगली रक्कम तयार होईल.
सुकन्या समृद्धी योजनेची वैशिष्ट्ये (Sukanya Samriddhi Yojana)
- या योजनेअंतर्गत केलेली गुंतवणूक पूर्णपणे करमुक्त आहे.
- योजनेतील गुंतवणुकीला प्राप्तिकरातून सवलत देण्यात आली आहे.
- १ एप्रिल २०२३ पासून या योजनेसाठी ८ टक्के व्याजदर लागू करण्यात आला आहे.
- बचत खाते उघडण्यासाठी किमान गुंतवणूक मर्यादा २५० रुपये, तर कमाल गुंतवणूक मर्यादा दीड लाख रुपये.
- खात्यात दरवर्षी दरवेळी वेगवेगळी रक्कम टाकण्याची सोय उपलब्ध.
- व्याजावरदेखील कर लागू नाही.
- योजनेचा कालावधी संपल्यानंतर बचत खात्यात जमा होणाऱ्या संपूर्ण रक्कमेवरही कर लागू होत नाही.
खाते कोठे काढायचे?
टपाल कार्यालय, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ इंडिया यांसारख्या सरकारी बॅंकांच्या शाखा, निर्धारित केलेल्या राष्ट्रीयकृत खासगी बॅंकांच्या शाखा.
आवश्यक कागदपत्रे
मुलीचा जन्मदाखला, पालकांचे आधार कार्ड, पॅन कार्ड यांसारखी केवायसी कागदपत्रे
किती रक्कम गुंतवणूक करता येते?
किमान : प्रति वर्षी २५० रुपये (दरवर्षी), कमाल : प्रति वर्षी दीड लाख रुपये. पहिल्यांदा खाते उघडताना किमान २५० रुपये खात्यात जमा करणे आवश्यक. खात्यात दरवेळी आपल्या सोयीनुसार वेगवेगळी रक्कम खात्यात भरता येते.
मुलीचा जन्म झाल्यानंतर ते ती दहा वर्षांची होईपर्यंत तुम्ही या योजनेअंतर्गत खाते काढू शकता. खाते काढल्यानंतर खात्यात १५ वर्षे होईपर्यंत त्यात न चुकता पैसे जमा करायचे आहेत. त्यावर व्याज मिळत राहील. संबंधित खात्याला १५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर १६ ते २१ वर्षे तुम्हाला वेगळे पैसे जमा करायचे नाहीत; पण खात्यातील रक्कमेवरील व्याज सुरूच राहील.
खात्याला २१ वर्षे पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण रक्कम तुमच्या बचत खात्यात जमा होईल. ही योजना लागू केली त्यावेळी योजनेला ७.६ व्याजदर लागू होता; परंतु एप्रिल २०२३ पासून या योजनेला ८ टक्के व्याजदर लागू केला आहे. हा दर तिमाहीला बदलतो.
खात्याला २१ वर्ष पूर्ण झाल्यानंतर बचत खात्यात संपूर्ण रक्कम जमा होते. अपवादात्मक परिस्थितीत योजनेतील पैसे काढण्याची मुभा आहे; परंतु तरीही योजनेअंतर्गत खाते उघडल्यानंतर त्या खात्याला पाच वर्ष पूर्ण होईपर्यंत कोणतीही रक्कम काढता येत नाही. पाच वर्षानंतरच रक्कम काही अपवादात्मक परिस्थितीत काढता येऊ शकते.
अपवादात्मक परिस्थिती –
१. मुलगी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर तिच्या शिक्षणासाठी लागणारे पैसे काढता येतात. त्यावेळी खात्यात जमा असणाऱ्या रक्कमेच्या जास्तीत जास्त ५० टक्के रक्कम काढता येते.
२. मुलीला अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिच्या लग्नासाठी योजनेतील संपूर्ण पैसे काढतात येतात.
३. मुलीला दुदैवी आजारपण आल्यास, त्यावरील उपचारासाठी योजनेअंतर्गत खात्यातून पैसे काढतात येतात. परंतु तेही खाते काढून पाच वर्षे झाल्यानंतरच ही रक्कम काढता येते.
सुकन्या समृद्धी खाते कधी बंद होते?
जेव्हा मुलगी 18 वर्षांची होते किंवा तिचे लग्न होते, यावेळी सुकन्या समृद्धी योजनेचं खातं बंद केलं जातं. याशिवाय खातेदाराचा मृत्यू झाल्यास खाते बंद होते.
तुम्ही 1000 रुपये गुंतवल्यास तुम्हाला किती पैसे मिळतील?
या योजनेत तुम्ही मासिक 1000 रुपये गुंतवल्यास, 12 हजार रुपये वार्षिक जमा होतील. SSY कॅल्क्युलेटरनुसार, 15 वर्षांमध्ये एकूण गुंतवणूक 1,80,000 रुपये असेल आणि 3,29,212 रुपये फक्त व्याजातून मिळतील. अशा प्रकारे, एकूण 5,09,212 रुपये मॅच्युरिटीवर मिळतील.
तुम्ही 2000 रुपये गुंतवल्यास तुम्हाला किती पैसे मिळतील?
तुम्ही दरमहा 2,000 रुपये गुंतवल्यास, तुम्ही वार्षिक 24,000 रुपये जमा कराल. एकूण गुंतवणूक 3,60,000 रुपये असेल आणि व्याज उत्पन्न 6,58,425 रुपये असेल. मॅच्युरिटीवर एकूण रक्कम 10,18,425 रुपये असेल.
तुम्ही 3000 रुपये गुंतवल्यास तुम्हाला किती पैसे मिळतील?
जर आपण दरमहा 3000 रुपयांवर आधारित गणना पाहिली तर वार्षिक 36,000 रुपये जमा होतील. एकूण गुंतवणूक 5,40,000 रुपये असेल. व्याजातून कमाई 9,87,637 रुपये होईल. एकूण 15,27,637 रुपये मॅच्युरिटीवर मिळतील.
तुम्ही 4000 रुपये गुंतवल्यास तुम्हाला किती पैसे मिळतील?
सुकन्या समृद्धी योजना (SSY) मध्ये 4000 रुपये गुंतवून, 48,000 रुपये वार्षिक जमा केले जातील. 15 वर्षांत एकूण 7,20,000 रुपयांची गुंतवणूक होईल. व्याजातून मिळणारे उत्पन्न 13,16,850 रुपये असेल. मॅच्युरिटी झाल्यावर, मुलीसाठी एकूण 20 लाख 36 हजार 850 रुपयांचा निधी तयार होईल.
तुम्ही 5000 रुपये गुंतवल्यास तुम्हाला किती पैसे मिळतील?
तुम्ही मासिक 5000 रुपये गुंतवल्यास, तुम्ही वार्षिक 60,000 रुपये गुंतवाल. अशा प्रकारे 15 वर्षात एकूण 9,00,000 रुपयांची गुंतवणूक होईल. 16,46,062 रुपये व्याजातून मिळतील. मुदतपूर्तीनंतर, तुम्हाला 25,46,062 चा मोठा निधी तयार होईल.
‘या’ योजनेतून उभारू शकता 60 लाखांपर्यंतचा निधी
60 लाख रुपये निधी बनवण्यासाटी किती बचत करावी
व्याज दर: वार्षिक 8 टक्के
मासिक ठेव: 11,250 रुपये
वार्षिक गुंतवणूक: 1,35,000 रुपये
15 वर्षात गुंतवणूक: 20,25,000 रु
21 वर्षांच्या मॅच्युरिटीवर एकूण रक्कम : 60,61,081 रुपये
व्याज लाभ: 40,36,081 रुपये