मुंबई | बांधकाम कामगारांसाठी परदेशातील नोकरीची मोठी संधी चालून आली आहे. या नोकरीत बांधकाम कामगारांना महिना 1 लाख 40 हजार ते 2 लाखांपर्यंत पगार मिळणार आहे. ही संधी इस्राईलमध्ये असून याबाबत शासनाकडून बांधकाम कामगारांना संपूर्ण मार्गदर्शन केले जाणार आहे.
जिल्हा स्तरावर जिल्हा कौशल्य, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे इच्छुकांनी संपर्क साधणे आवश्यक आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बांधकाम कामगारांना याबाबत आवाहन केले आहे. फ्रेमवर्क, शटरिंग कारपेंटर, बार बेंडिंग मेसन, सिरेमिक टाइलिंग मेसन, प्लास्टरिंग मेसन या ट्रेडसाठी अर्ज करावा लागणार आहे.
या नोकरीतून प्रत्येक कामगाराला महिन्याला 1 लाख 40 हजार ते 2 लाखांपर्यंत पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी 21 ते 45 वर्षे वयोगटातील कामगार अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान दहावीपर्यंत शिक्षण असणे आवश्यक आहे. त्यामुळे दहावी पास असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे.
कामगाराला किमान एक वर्षे ते कमाल पाच वर्षांच्या नोकरीसाठी अनिवार्य करारावर स्वाक्षरी करावी लागेल. तसेच कामाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे यापूर्वी त्या उमेदवाराने इस्राईलमध्ये नोकरी केलेली नसावी, ही महत्वाची अट या भरती प्रक्रियेसाठी ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर उमेदवाराच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने यापूर्वी इस्राईलमध्ये काम केलेले नसावे.
यासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारानी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/mic या संकेतस्थळावर भेट द्यावी. तसेच 8291662920 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकता, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाकडून करण्यात आले आहे.