पुणे | आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे भाव (Soybean Market Price) एक टक्क्याने वाढले होते. देशात मात्र सोयाबीनच्या दरात क्विंटलमागे 50 रुपयांचा चढ उतार सुरु आहे. देशातील सोयाबीनची भावपातळी पुढील काळात 5 हजार 500 रुपयांपर्यंत वाढू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. अॅग्रोवनने याबाबत वृत्त दिले आहे.
Soybean Market Price
अॅग्रोवनने दिलेल्या वृत्तानुसार, आज दुपारपर्यंत सीबाॅटवर सोयाबीनमध्ये जवळपास एक टक्क्याची वाढ होऊन भाव 13.25 डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. रुपयात सांगायचे झाले तर हा भाव 4 हजार 50 रुपये आहे. तर सोयापेंडचे वायदे 434 डाॅलरवर होते. रुपयात हा भाव 36 हजार 136 रुपये प्रतिटन आहे.
भारतीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडीच्या दराची स्थिती काय?
भारतीय बाजारात म्हणजेच सध्या आपल्याकडे वायदे बंद आहेत. पण बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला 4 हजार 400 ते 4 हजार 600 रुपयांचा भाव (Soybean Market Price) मिळाला आहे. तर सोयापेंड 42 हजार ते 43 हजारु रुपये प्रतिटनाने विकली जात आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडीचे दर का वाढले?
सीबाॅटवर म्हणजेच अमेरिकेत सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात वाढ होण्याची दोन प्रमुख कारणे आहेत. यातील पहिले कारण म्हणजे, बायोफ्यूल म्हणजेच जैवइंधनासाठी सोयातेलाला मागणी वाढत आहे. त्यामुळे सोयातेलाचे भावही वाढले आहेत. तसेच अमेरिकेच्या काही भागात पावसाची कमतरता आहे. याचाही परिणाम सोयाबीनच्या दरावर दिसून येत आहे.
दुसरे महत्वाचे कारण म्हणजे सोयाबीन आणि सोयापेंडला इतर देशांकडून मागणी सुरू आहे. अर्जेंटीनात मागच्या हंगामात सोयाबीन उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. यामुळे अर्जेंटीनातून सोयातेल आणि सोयापेंड निर्यात कमी झाली. त्यातच ब्राझीलमध्ये सोयाबीन निर्यातीसंबंधी अडचणी निर्माण झाल्याने अमेरिकेच्या सोयाबीनला उठाव मिळाला. चीनने यंदा अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात आयात केली आहे. ही आयात आताही सुरु आहे. त्यामुळे सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात वाढ दिसून येत असल्याचे अभ्यासकांनी सांगितले आहे.