CareerNews

Set Exam 2024 : सेट परिक्षेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आणि परिक्षेच्या तारखेचे वेळापत्रक जाहीर

पुणे | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रता परीक्षेसाठी (Set Exam 2024) ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 12 जानेवारीपासून सुरू होणार आहे. याबाबतचे सविस्तर वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे.

सेट विभागातर्फे 39 वी सेट परीक्षा येत्या 7 एप्रिल रोजी आयोजित करण्यात येत आहे. ही शेवटची ऑफलाईन सेट परीक्षा ठरणार असून, त्यासाठी उमेदवारांमध्येही कमालीची उत्सुकता आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया येत्या 12 जानेवारीपासून सुरू होणार आहेत. तर 31 जानेवारी 2024 पर्यंत नियमीत शुल्कासह परीक्षा अर्ज भरण्यास वेळ दिला जाणार आहे.

फेब्रुवारीच्या 1 तारखेपासून 7 तारखेपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज स्वीकारले जातील. परीक्षेचे हॉल तिकीट व इतर माहिती सेट विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे सेट परीक्षा अर्ज भरण्याची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Set Exam 2024
Set Exam 2024

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सेट परीक्षेचे आयोजन केले जाते. नेट परीक्षेप्रमाणेच सेट परीक्षा सुद्धा ऑनलाइन पद्धतीने घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या होत्या.परंतु, विद्यापीठातर्फे एप्रिल महिन्यात होणारी सेट परीक्षा ही ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे.

यापुढील ४० वी सेट परीक्षा ही ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल. तसेच या परीक्षेच्या संदर्भातील वेळापत्रक, अभ्यासक्रम व इतर आनुषंगिक माहिती वेळोवेळी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

Back to top button