Sericulture

शेतकऱ्यांसाठी खुशखबर, रेशीम शेतीसाठी मिळतंय 4 ते 92 लाखाचे अनुदान; वाचा कसे मिळवायचे अनुदान | Sericulture

मुंबई | सध्या रेशीम शेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. बाजारात रेशीमला चांगली मागणी असल्याने दर देखील चांगले मिळत आहेत. त्यामुळेच शेतकऱ्यांना रेशीम शेतीसाठी (Sericulture) प्रोत्साहित करण्यासाठी शासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. याचाच भाग म्हणून रेशीम शेतीसाठी मनरेगा अंतर्गत एक एकराच्या लागवडीसाठी सुमारे चार लाखांपर्यंतचे अनुदान दिले जात आहे.

महारेशीम अभियानांतर्गत रेशीम शेतीत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना 20 डिसेंबर पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. या अनुषंगाने रेशन कार्यालयासह मनरेगाची यंत्रणा महसूल व कृषी विभागात शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी अधिकारी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे रेशीम शेतीच्या अधिक माहितीसाठी महसूल कृषी विभाग किंवा रेशीम कार्यालयाला भेट द्या, असे आवाहन करण्यात आले आहे.

रेशीम शेतीचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा अल्पभूधारक असणे आवश्यक आहे. यामध्ये अनुसूचित जाती जमातीतील महिलांना प्राधान्य दिले जाते. लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे सिंचनाची बारमाही किंवा किमान आठमाही सोय असावी. मनरेगा कृती आराखडा व ग्रामसभेचा ठराव आवश्यक असून लाभार्थी हा जॉब कार्डधारक असावा. रेशीम शेतीच्या अनुदानाची रक्कम ही तीन वर्षांमध्ये वितरित करण्यात येते.

पहिल्या वर्षी : या योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना एक एकराच्या मर्यादेत पहिल्यावर्षी अकुशल मजुरी 1 लाख 26 हजार 720 रुपये तर कुशलसाठी 93 हजार 210 रुपये, असे एकूण 2 लाख 19 हजार 930 रुपये मिळतात.

दुसऱ्या वर्षी : लागवडीनंतर आवश्यक असलेल्या मजूर कामापोटी अकुशल स्वरूपात 51 हजार 200 रुपये दिले जातात. तर सामग्री, कुशल मजुरीपोटी 10 हजार 285 रुपये देण्याची तरतूद आहे.

तिसऱ्या वर्षी : अखेरच्या टप्यात आवश्यक असलेल्या कामांसाठी अकुशल मजुरी म्हणून 51 हजार 200 रुपये मिळतात. तर कुशल मजूर आणि सामग्रीपोटी 10 हजार 285 रुपये मिळतात.

रेशीम शेतीविषयक शासनाच्या योजना जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

सर्वसामान्य लाभार्थ्यांसाठी जॉब कार्ड असेल तर एकूण खर्चाच्या 75 टक्के अनुदान हे तीन वर्षात मिळते. तर अनुसूचित जाती आणि जमाती मध्ये लाभार्थ्यांसाठी 90 टक्के अनुदान तीन वर्षात विभागून दिले जाते. यामध्ये एक एकर तुतीची लागवड बंधनकारक राहणार आहे. तर सिल्क समग्र योजनेच्या माध्यमातून रेशीम शेती आणि प्रक्रिया उद्योगांसाठी तब्बल 92 लाखांपर्यंत अनुदान दिले जाते.

अशा पद्धतीने करू शकता अनुदानासाठी अर्ज

  • रेशम संचालनालयाची संकेतस्थळ mahasilk.maharashtra.gov.inयावर साईन अप मध्ये न्यू यूजर वर क्लिक करावे.
  • त्यानंतर आय ॲग्री केल्यानंतर स्टॅक होल्डर मध्ये farmer mulberry/Tasar वर क्लिक करावे.
  • त्यानंतर लाभार्थ्यांनी सर्व माहिती भरून शेवटी स्वतःच पासपोर्ट साईजचा फोटो,आधार कार्ड व बँक पासबुकची फोटो कॉपी अपलोड करावी.
  • शेवटी सबमिट केल्यानंतर शेतकऱ्यांच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाल्याचे कम्प्युटरच्या स्क्रीनवर एसएमएस येईल.
  • ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर संबंधित जिल्हा रेशीम कार्यालय जाऊन सातबारा, 8अ चा उतारा, त्यांचे च्या पहिल्या पानाची झेरॉक्स, जॉब कार्ड नोंदणी शुल्कासह देउन नोंदणी पूर्ण करावी.
Scroll to Top