नगर बाजार समितीत कांद्याला 4200 रुपयांचा दर, दरातील सुधारणा किती दिवस टिकणार? Onion Market Price
अहमदनगर | नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात सुधारणा होत आहे. सोमवारी (ता. 16) झालेल्या लिलावात कमाल दर 3800 रुपये क्विंटलपर्यंत मिळाला होता. गुरुवारी (ता. 19) झालेल्या लिलावात कमाल दर 4200 रुपयापर्यंत मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पहिल्यांदाच बाजारात कांदा दरात सुधारणा दिसून आली आहे.
काही महिन्यापूर्वी कांदा दर वाढू लागताच केंद्र सरकारने निर्यात शुल्क लागू केले. त्यामुळे कांद्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण झाल्याचे चित्र होते. त्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून कांदा दर अडीच हजारांच्या आसपास स्थिर होते. यंदा मार्च-एप्रिलमध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा कांद्याला मोठा फटका बसला. तसेच साठवण करून ठेवलेला कांदाही फार दिवस टिकला नाही.
परिणामी यंदा कांदा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका सोसावा लागला आहे. यंदा पहिल्यांदाच कांदा दरात काहीशी सुधारणा होताना दिसत आहे. गेल्या आठ दिवसापासून कांदा दरात सुधारणा होत असून अडीच हजारांवर स्थिर असलेला कांदा गुरुवारच्या लिलावात किमान 500 ते कमाल 4200 रुपयांपर्यंत गेला आहे. तर सरासरी दर 3500 रुपयांपर्यंत मिळाला आहे.
नगर बाजार समितीत प्रत्येक लिलावाला साधारणतः 80 हजार ते एक लाख गोण्यापर्यंत आवक होते. सध्या मात्र आवक कमी झाली असून दर लिलावाला 40 ते 45 हजार गोण्यापर्यंत आवक होत आहे. यामुळेच दरात सुधारणा होत असल्याचे पहायला मिळत आहे.