मुंबई | वर्ल्ड कप 2023 च्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध गोलंदाजी करताना हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती. यामुळे तो लंगडतच मैदानातून बाहेर पडला. त्यानंतर त्याच्या पायाचे स्कॅनिंग करण्यात आले. यामध्ये त्याच्या पायाला दुखापत झाल्याचे दिसून आले.
दरम्यान, पांड्या 22 ऑक्टोबरला धर्मशाला येथे होणार्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडल्याचे सांगण्यात येत आहे. पांड्या पुढील उपचारासाठी बेंगळुरू येथील एनसीएमध्ये जाणार असल्याचे समजते. तेथे त्याला इंजेक्शन देखील दिले जाऊ शकतात.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, हार्दिक पांड्या लखनऊमध्ये संघात परत सामील होऊ शकतो आणि तो 29 ऑक्टोबरला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी हजर राहू शकतो. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हार्दिक पांड्या बेंगळुरूला जाणार आहे, जिथे त्याला एनसीएला अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे.
वैद्यकीय पथकाने हार्दिक पांड्याच्या घोट्याच्या स्कॅन केले आहे. रिपोर्टमध्ये असे दिसत आहे की इंजेक्शन दिल्यानंतर तो बरा होईल. बीसीसीआयने इंग्लंडमधील तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला असून त्यांचेही तेच मत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पांड्या पुढील सामना खेळू शकणार नाही.
बांगलादेशविरुद्धच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाने 7 विकेट्सने मोठा विजय नोंदवला. भारतीय संघाने आतापर्यंत खेळलेले चारही सामने जिंकले आहेत.