AgricultureGovt. Scheme

खुशखबर! नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत उद्या 86 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 1720 कोटी जमा होणार | Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana

मुंबई | केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारही नमो किसान महासन्मान निधी (Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana) योजनेचा पहिला हप्ता देण्याच्या तयारीत आहे. यासाठी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण करणे तसेच अन्य अटींची पूर्तता करण्याबाबत मागच्या दोन महिन्यांपासून सूचना करण्यात येत होत्या. नमो किसान महासन्मान योजनेचा राज्यातील 86 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

उद्या मिळणार नमो किसानचा पहिला हफ्ता (Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana)

दरम्यान राज्य शासनाने घोषित केलेल्या नमो किसान महासन्मान योजनेतून राज्यातील सुमारे 86 लाख शेतकऱ्यांना 2 हजार रुपयांप्रमाणे पहिल्या हप्ता मिळणार आहे. उद्या गुरुवारी (दि.26) रोजी शिर्डी येथे होणाऱ्या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे प्रातिनिधिक वितरण करण्यात येणार आहे. यासाठी कृषी विभागाने 1720 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

कृषी, महसूल, भूमी अभिलेख आदी विभागांचा समन्वय साधून ई-केवायसी पूर्ण करणे, भूमी अभिलेखाच्या नोंदी अद्ययावत करणे, आधार बँक खात्याशी संलग्न करणे आदी बाबींची पूर्तता करून घेत राज्यातील 13 लाख 45 हजार शेतकरी या पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान या दोन्हीही योजनांच्या लाभास पात्र ठरले आहेत.

पीएम किसान योजना जेव्हा सुरू करण्यात आली त्यावेळी राज्यातील सुमारे 1 कोटी 19 लाख शेतकऱ्यांनी या योजनेत नोंदणी केली होती. त्यापैकी सुमारे 95 लाख शेतकरी पात्र ठरले होते. अटींची पूर्तता न केल्याने 13 व्या आणि 14 व्या हप्त्यात त्यापैकी 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांना पीएम किसानचा प्रत्यक्ष लाभ मिळाला. तर 15 व्या हप्त्यासाठी ई-केवायसीची अट आता अनिवार्य करण्यात आली आहे.

दरम्यान 95 लाख लाभार्थी शेतकऱ्यांपैकी मयत, कर भरणारे व इतर कारणांनी रद्द झालेले वगळता 92.87 लाख शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यापैकी 82.59 लाख शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण झालेले आहे. धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून कृषीविभागाने विशेष मोहीम हाती घेतल्यानंतर ग्रामपंचायत पदाधिकारी, कृषीमित्र, यांच्यासह कर्मचाऱ्यांनी कॅम्प घेऊन, बांधावर जाऊन 13 लाख 45 हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण केले आहे.

यामध्ये बँक खाते संलग्न करणे, भूमिअभिलेख नोंदी पूर्ण करून अद्ययावत करून घेणे या अटींची पूर्तता करून घेण्यात आली आहे. यात 9.58 लाख शेतकऱ्यांचे ई-केवायसी, 2.58 लाख शेतकऱ्यांचे खाते आधार संलग्न करणे, 1.29 लाख शेतकऱ्यांच्या भूमिअभिलेख नोंदी अद्ययावत करणे इत्यादी कामे पूर्ण झाली आहेत.

Back to top button