News

मंत्री मुश्रीफ यांच्या गाडीची मुंबईत मराठा आंदोलकांकडून तोडफोड; दोघे पोलिसांच्या ताब्यात

मुंबई | राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची मुंबईत तोडफोड करण्यात आली. आकाशवाणी आमदार निवास इथे उभ्या असलेल्या मुश्रीफांच्या गाडीवर काही अज्ञात लोकांकडून दगडफेक करून गाडी फोडण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या शांततामय मार्गाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. आंदोलकांनी मुश्रीफांची गाडी हेरुन तिची तोडफोड केली. यामुळे मंत्रालय आणि आसपासच्या परिसरात आता पोलीस फौटफाटा वाढवण्यात आला आहे. मंत्रालयातही येणाऱ्या जाणाऱ्यांची चौकशी केल्यानंतरच त्यांना आत सोडलं जात आहे.

मुंबई येथे मुश्रीफांच्या गाडीवर हल्ला झाल्याचे समजताच मुश्रीफांच्या कोल्हापूरमधील निवासस्थानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ज्या गाड्या फोडण्यात आल्या आहेत, त्या मरिन लाईन्स पोलीस स्थानकात नेण्यात आल्या आहेत. ज्यावेळी हल्ला झाला, त्यावेळी तिथे पोलीस उपस्थित होते. पोलिसांनी तात्काळ आक्रमक मराठा आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. 

गाडीच्या तोडफोड प्रकरणी बोलताना हसन मुश्रीफ यांनी म्हटलं की, मी सुरक्षित आहे. ज्यांनी माझ्या गाडीची तोडफोड केली, त्या तरुणांना सोडून द्यावं. त्यांना कोणतीही शिक्षा करू नये, अशी माझी विनंती आहे. मराठा समाज हा आमचाच समाज आहे. आरक्षण मिळेपर्यंत आम्ही मराठा समाजाच्या पाठीशी राहणार आहोत. मंत्र्यांची घरं जाळणं हे अत्यंत गंभीर आहे. यामुळे आंदोलनाला गालबोट लागत आहे, असंही हसन मुश्रीफ म्हणाले आहेत. 

दरम्यान, मराठा आंदोलकांकडून काही दिवसांपूर्वी वकील गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीचीही तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी तीन जणांना भोईवाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करणारे मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप करण्यात आला होता.

Back to top button