News

जरांगे पाटील यांच्यासाठी अभिनेता रितेश देशमुखने शेअर केली पोस्ट, म्हणाला… | Manoj Jarange

मुंबई | मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करत असलेले मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange) यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. उपोषणा दरम्यान जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने मराठा समाजासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातून त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. प्रसिध्द अभिनेते रितेश देशमुख यांनीही साेशल मीडियावर पाेस्‍ट शेअर करत जरांगे पाटील यांच्याविषयी चिंता व्यक्त केली आहे. रितेश देशमुख यांनी केलेल्या पोस्ट मध्ये म्‍हटले आहे की, “जरांगे पाटील यांच्या तब्येतीसाठी मी प्रार्थना चिंततो. आणि या प्रश्नावर तातडीने तोडगा निघेल अशी अपेक्षा बाळगतो.” (Maratha reservation)

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनला जोर आला आहे. मराठा आंदोलनकर्त्यांनी सरकारला 40 दिवसांचा कालावधी दिला होता. तरीही सरकारने मराठा आरक्षणावर ठोस निर्णय घेतला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणास बसले आहेत. जरांगे पाटील यांच्या बाबतीत काळजी व्यक्त करत अभिनेते रितेश देशमुख यांनी आपल्या ‘X’ खात्यावर पोस्टसह जरांगे पाटील यांचा फोटो शेअर केला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ”अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा समाजातल्या मागास घटकांच्या न्याय्य मागणीसाठी जरांगे पाटील शांतीपूर्ण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या तब्येतीसाठी मी प्रार्थना चिंततो. या प्रश्नावर तातडीने तोडगा निघेल अशी अपेक्षा बाळगतो.“

आरक्षण देण्यास किती वेळ हवा हे तरी कळूदे – मनोज जरांगे पाटील

मला समाजापेक्षा कुणीही मोठं नाही, फक्त पुरावे असलेल्यांना प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध आहे. महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना आरक्षण मिळावे, सरसकट मराठ्यांना दाखले द्यावेत, आम्ही अर्धवट आरक्षण घेणार नाही, असा ठाम निर्धार मनोज जरांगे- पाटील यांनी आज (दि.30) अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेत बोलून दाखविला. जरांगे-पाटील म्हणाले की, मी आंदोलन थांबवणार नाही, असे विखे- पाटील यांना फोनवरून सांगितले आहे. परंतु मराठा आंदोलकांच्या विनंतीचा मान राखत मी आज पाणी घेत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आरक्षणासाठी थोडा म्हणजे अजून किती वेळ हवा आहे, हे तरी कळू दे, असेही ते म्‍हणाले.

आमच्या आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरू व्हायचा आहे. 1 नोव्हेंबरपासून आमच्या आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरू होत आहे. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके आता सोसायटीतही निवडून येणार नाहीत, असा दावा करून पोलिसांनी मराठा आंदोलकांना त्रास द्यायचे थांबवावे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वाचाळ माणसांना आवर घालावा, आमच्या वाटेला गेला, तर मराठे सोडणार नाहीत, असा इशाराही जरांगे-पाटील यांनी दिला. आमच्या आंदोलनाला कुणी तरी गालबोट लावत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

Back to top button