तुम्हाला ‘नमो शेतकरी’ योजनेचा लाभ न मिळण्यात ‘या’ आहेत अडचणी.. जाणून घ्या सविस्तर | NAMO Shekari Yojana

0
235

मुंबई | राज्य शासनाने केंद्र सरकारच्या धर्तीवर ‘नमो शेतकरी’ महासन्मान निधी योजना (NAMO Shekari Yojana) सुरू केली आहे. सध्या संपूर्ण राज्यात या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ देण्यात येत आहे.

नमो शेतकरी योजना (NAMO Shekari Yojana) राज्यभर लागू करण्यात आली असली तरी योजनेच्या पहिल्या हप्त्याचा लाभ बऱ्याच शेतकऱ्यांना मिळालेला नाही. याला बँक खात्याशी निगडीत विविध बाबी कारणीभूत ठरल्याचे समोर आले आहे.

लाभ न मिळालेल्या खात्यांबाबत माहिती संकलित केली असता विविध बाबी समोर आल्या. यात बँकेकडून संबंधित बँक खाते बंद किंवा गोठवलेले असणे, बँकेने एनपीसीआय पोर्टलवरून आधार क्रमांक डीसीडेड केलेला असणे, आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला नसणे, बँक खाते बंद असणे, बँकेने खात्यावर कमाल क्रेडिट मर्यादा निश्‍चित केलेली असणे, बऱ्याच कालावधीपासून बँक खाते वापरात न ठेवल्याने बँकेने ते खाते डॉर्मंट केलेले असणे, बँक खाते अवैध प्रकारचे असणे, केवायसी प्रलंबित असणे, कोणत्याही प्रकारचा दावा न केलेले बँक खाते, अशी कारणे समोर आली आहेत.

याबाबत शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन तपासणी करावी. बंद असलेले किंवा इतर कुठल्याही कारणाने व्यवहार होत नसल्याचे कारण शोधून त्यात तातडीने सुधारणा करावी. आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला नसल्यास अथवा बँकेने एनपीसीआय पोर्टलवरून आधार क्रमांक डीसीडेड केला असल्यास बँकेशी संपर्क साधणे गरजेचे आहे.

राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु केली असून राज्यात योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या द्वारे शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपयांचा लाभ देण्यात येत आहे. योजनेच्या पहिल्या हप्त्याचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांनी काही बाबी तपासून घ्याव्यात. बँक खाते सुरु असल्याची खात्री करावी, असे आवाहन या निमित्ताने बुलडाणाचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.