नवी दिल्ली | नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण आगामी 3 महिन्यांत भारतीय औद्योगिक जगतात जगाच्या तुलनेत सर्वाधिक नोकर भरतीची (Job Opportunities) शक्यता आहे.
‘मॅनपाॅवर ग्रुप एम्प्लॉयमेंट आउटलूक सर्व्हे’मध्ये ही माहिती देण्यात आली आहे. अहवालानुसार, देशांतर्गत मागणी वाढल्यामुळे 37 टक्के कंपन्या कर्मचारी संख्येत वाढ करण्याची योजना बनवित आहेत.
या सर्वेक्षणात 41 देशांतील विभिन्न क्षेत्रांतील सुमारे 3,100 कंपन्या सहभागी झाल्या होत्या. यात भारताचा ‘नेट एम्प्लॉयमेंट आउटलूक’ (एनईओ) सर्वाधिक असल्याचे आढळून आले आहे.
‘मॅनपाॅवर ग्रुप’चे भारत व पश्चिम आशियाचे व्यवस्थापकीय संचालक संदीप गुलाटी म्हणाले की, मागणीत वाढ आणि खासगी गुंतवणुकीतील सातत्य यामुळे कर्मचारी भरतीला गती मिळेल. रिअल इस्टेट क्षेत्रात सर्वाधिक 45 टक्के, त्याखालोखाल आयटीत 44 टक्के, तर ग्राहक वस्तू व सेवा क्षेत्रात 42 टक्के भरतीची शक्यता आहे.
सर्वेक्षणातील या भरतीच्या आकडेवारीमुळे विविध क्षेत्रात नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांच्या आशा नक्कीच पल्लवीत होणार आहेत.