मुंबई | काँग्रेस-शिवसेना (Uddhav Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) यांच्या महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) प्रकाश आंबेडकर यांना लोकसभा जागावाटप चर्चेत सामील होण्यास परवानगी दिली आहे. महाविकास आघाडीने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शिवसेनेचे (Uddhav Thackeray) खासदार संजय राऊत यांच्या स्वाक्षरी असलेले लेटरहेडवर याबाबतचे आमंत्रण जारी केले आहे. दरम्यान काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी स्वत: प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची विभागीय आढावा बैठक धुळे येथे पार पडली. उत्तर महाराष्ट्र विभागाची आढावा बैठक ‘द्वारकमाई बँक्वेट हॉल’ धूळे येथे पार पडली. या बैठकीला महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांची प्रमुख उपस्थिती होती.
“मी स्वत: प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा केली असून काँग्रेस पक्षातर्फे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे त्यांच्याशी जागा वाटपासंदर्भात चर्चा करणार आहेत”, अशी माहिती धुळे येथे पत्रकार परिषदेत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली.
वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा भाग होण्यास इच्छुक आहे. मात्र प्रकाश आंबेडकरांनी नुकतेच या मुद्द्यावर काँग्रेसला एक पत्र लिहिले होते, ज्यात महाराष्ट्रातील सर्व 48 लोकसभा जागांवर निवडणूक लढवण्याचा इशारा दिला होता, ज्यामुळे राज्यातील विरोधी पक्षांना धक्का बसला होता.