मुंबई | महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचे (टीईटी) अर्ज जानेवारीत घेतले जाणार आहेत. तर फेब्रुवारी महिन्यात पहिली ऑनलाईन टीईटी परीक्षा (Maha TET Exam 2024) घेतली जाण्याची शक्यता आहे. चार वर्षांच्या कालावधीनंतर शिक्षण विभागाकडून ही टीईटी घेतली जाणार आहे. यासाठी नोंदणी प्रक्रिया आणि त्याचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून लवकरच जाहीर केला जाणार असल्याचे समजते.
काय आहेत ऑनलाईन परीक्षेचे फायदे..
- टीईटी वेळेत घेऊन निकाल लवकर जाहीर करण्यास होणार मदत
- परीक्षेतील गैरप्रकारांना पूर्ण आळा बसणार
- परीक्षेसाठी आवश्यक मनुष्यबळाचा वापर कमी होणार
- परीक्षा पारदर्शक होण्यास मदत होणार
- ऑफलाईन परीक्षेत होत असलेल्या चुका टाळण्यास होणार मदत
आयबीपीएस आयटी कंपनीमार्फत संबंधित परीक्षा घेण्याची निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आले असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी दिली. प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिक्षक होण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात (टीईटी) पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी या वर्गासाठी टीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळ, सर्व माध्यम अनुदानित, कायम विनाअनुदानित आदी शाळांमध्ये शिक्षणसेवक शिक्षकपदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. त्यासाठी परीक्षा परिषदेकडून दरवर्षी संबंधित शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येते.
गेल्या दोन वर्षांत टीईटीमध्ये गैरप्रकार झाल्यानंतर संबंधित परीक्षेच्या कारभारावर संशय निर्माण झाला होता. अनेकांना नोकरीपासून वंचित राहावे लागले आहे. यापुढे गैरव्यवहार होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आता शिक्षक पात्रता परीक्षा ऑनलाइन घेण्याची तयारी सुरू केली आहे.
गेल्या दोन वर्षांत टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली नाही. मुळातच टीईटी परीक्षेत अनेक बोगस उमेदवार सापडले असताना त्यांच्यावर अद्याप कठोर कारवाई केली गेली नाही. शासन जानेवारीत अधिसूचना जाहीर करून फेब्रुवारी २०२४ ला पुन्हा एकदा शिक्षक पात्रता परीक्षा घेणार आहे.