कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील वाहतूक बंद होणार; कोकणात जाण्यासाठी पर्यायी मार्ग ‘हे’ असतील! Kolhapur to Gaganbawda Road

0
109

कोल्हापूर | कोल्हापूर ते गगनबावडा (Kolhapur to Gaganbawda Road) मार्गावरुन होणारी अवजड वाहतूक प्रतिबंधित करण्यात येणार आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत. आदेशानुसार 31 जानेवारी 2024 पर्यंत या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक सायंकाळी 6 ते सकाळी 10 या वेळेत पूर्णतः बंद करुन पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. तसेच सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत फक्त अत्यावश्यक सेवा व प्रवासी वाहतूक सुरु ठेवण्यास परवानगी असेल, असे आदेशात म्हटले आहे. 

1 फेब्रुवारी ते 25 एप्रिल 2024 या कालावधीत वाहतूक पूर्णपणे बंद

कोल्हापूर गगनबावडा मार्ग जड वाहतुकीस सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. 1 फेब्रुवारी ते 25 एप्रिल 2024 या कालावधीत वाहतूक पूर्णपणे बंद करुन अन्य मार्गाने वळविण्यात येणार आहे. वाहतुक सुरक्षा उपायोजनेद्वारे वाहतुक नियंत्रित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.

कोल्हापूर- गगनबावडा-करुळ घाट दुरुस्तीसाठी बंद राहणार

कोल्हापूर- गगनबावडा-करुळ घाट हा दुरुस्तीसाठी बंद राहणार आहे. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील वाहतूक पर्यायी कोल्हापूर-दाजीपूर मार्गे कोकण-गोवा तसेच कोल्हापूर-कळे-बाजार भोगाव-पाचल-लांजा-राजापूर अशा मार्गाने कोकणकडे जाण्यास पर्यायी मार्ग आहे. करुळ घाटातून होणाऱ्या वाहतुकीसाठी कोल्हापूर-भोगावती-गैबी-राधानगरी-फोंडा तसेच निपाणी-मुदाळ तिट्टा- गैबी-राधानगरी फोंडा असा पर्यायी मार्ग आहे.  

गगनबावडा तालुक्यातील असळज येथील डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्याचा गळीत हंगाम सध्या सुरु असल्याने कारखान्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून काही प्रमाणात ऊस येतो. ही ऊस वाहतूक करुळ घाट मार्गाने होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून होणारी ऊस वाहतुक संबंधित कारखान्याकडून पूर्ण झाल्यानंतरच हा मार्ग बंद करण्यात येणार आहे. 

करुळ घाट बंद केल्यानंतर जे पर्यायी मार्ग सुचवण्यात आले आहेत त्यामध्ये तळेरे-भुईबावडा-गगनबावडा-कळे-कोल्हापूर असा मार्ग प्रवासी वाहतुकीसाठी सुचविण्यात आला आहे. परंतु हा घाट अत्यंत अरुंद, तीव्र उतार व वळणाचा आहे. या मार्गाने फक्त हलक्या प्रवासी वाहनांनाच परवानगी असावी, अन्यथा अपघातांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता असल्याचेही आदेशात म्हटले आहे.