वातावरणातील हवेत 13 अब्ज टन ताजे पाणी, इस्रायल हवेपासून ‘हे’ पाणी कसे तयार करतो? वाचा सविस्तर…

0
2639

इस्रायल ‘वॉटरजेन’ कंपनीने तयार केलेल्या तंत्रज्ञानाच्या मदतीने हवेपासून पिण्यायोग्य पाणी तयार करतो. इस्रायलशिवाय भारतासह जगातील अनेक देशांतील कंपन्या या दिशेने वाटचाल करत असून त्यांना यामध्ये चांगले यशही मिळाले आहे. परंतु हवेपासून पाणी तयार करण्याच्या तंत्रज्ञानातील त्रुटींमुळे ते यशस्वी होण्याबाबत काही तज्ज्ञांनी शंका व्यक्त केली आहे.

How Israel Creates Water from Air

वातावरणात 13 अब्ज टन ताजे पाणी आहे, जे या तंत्रज्ञानाच्या मदतीने वापरता येऊ शकते. जगातील आठ अब्ज लोकांची तहान भागवण्यासाठी हे पाणी पुरेसे आहे.

हवेतून पाणी बनवण्याचे तंत्रज्ञान नेमकं काय आहे?

‘वॉटरजेन’ नावाच्या इस्रायली कंपनीने हवेपासून पाणी तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले असून त्याला आंतरराष्ट्रीय पेटंटही मिळाले आहे. हवेपासून पाणी तयार करण्याच्या या तंत्राला ‘अ‍ॅटमॉस्फेरिक वॉटर जनरेशन’ (वातावरणातून पाण्याची निर्मिती) असेही म्हणटले जाते. वॉटरजेन कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हवेपासून पाणी तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये मशीनद्वारे हवा शोषली जाते. त्यानंतर विशिष्ट प्रकारचे एअर फिल्टर त्यातील प्रदूषके काढून टाकते आणि फक्त स्वच्छ हवा आत घेते. हवा आत घेतल्यानंतर ऊर्जा विनिमयाद्वारे पाणी वेगळे करून टाकीत गोळा केले जाते. गोळा केलेले पाणी अल्ट्राव्हायोलेट किरणांमधून नेले जाते, जेणेकरून त्यातील अशुद्धता काढून टाकणे शक्य होते. त्यानंतर हे पाणी पिण्यायोग्य बनते.

‘वॉटरजेन’ कंपनीने तयार केलेल्या तंत्रज्ञानाच्या मदतीने पाणी तयार करताना त्याचा हवामानावर कोणताही विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाही. त्यामुळे हे तंत्रज्ञान सध्याच्या लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होत असलेल्या पाण्याच्या समस्येवर चांगला उपाय ठरणार आहे. कारण जगातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांवर सतत ताण पडतोय, परिणामी प्रदूषण होत आहे. तसेच, पाणी वितरण करणाऱ्या पाईपलाईन कालांतराने जुन्या, खराब होतात आणि त्याला सतत साफसफाईची आवश्यकता भासते. तसेच पाईपलाईनमध्ये वेळोवेळी बिघाड झाल्याने त्यात वेगवेगळी प्रदूषके मिसळतात, अशावेळी या प्रकारची स्वतंत्र यंत्रणा नागरिकांच्या गरजा पूर्ण करू शकते असे जाणकारांचे म्हणणे आहे.

भारतासह जगातील अनेक देशांमध्ये जलप्रदूषणामुळे अनेक भागात भूजल प्रदूषित झाले आहे, अशा प्रदेशात ही यंत्रणा उपयुक्त ठरू शकते. तेल अवीव विद्यापीठातील संशोधनाच्या निष्कर्षांनुसार, हवेत प्रदूषण असले तरीही, WWG तंत्रज्ञानाद्वारे जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांची पूर्तता करणारे पिण्यायोग्य पाणी तयार केले जाऊ शकते.

‘अ‍ॅटमॉस्फेरिक वॉटर जनरेशन’ तंत्रातील अडचणी

हवेपासून पाणी बनवण्याच्या तंत्रज्ञानावर अनेक जगभरातील अनेक कंपन्या काम करत आहेत. काही कंपन्या वातावरणातील हवा शोषून न घेता फक्त पाण्याचा अंश असलेले कण शोषून घेतात, परिणामी उर्जेचा वापर कमी होतो. तर काही कंपन्या उष्णता किंवा शीत विनिमय प्रक्रिया न बदलता पारंपारिक रिव्हर्स ऑस्मोसिस आणि कार्बन फिल्टर आणि यूव्हीद्वारे पिण्यायोग्य शुद्ध पाणी बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणत्याही तंत्रज्ञानाप्रमाणे, हवेपासून पाणी तयार करण्याच्या तंत्रज्ञानाला काही मर्यादा आहेत. हे तंत्रज्ञान खूप महाग आहे. तसेच गरीब आणि उपेक्षित नागरिकांना वैयक्तिक पातळीवर त्याचा वापर करणे परवडणारे नाही.

हे तंत्रज्ञान पूर्ण क्षमतेने कार्य करण्यासाठी वातावरणात 30 टक्के आर्द्रता असणे आवश्यक आहे आणि सामान्य कामगिरीसाठी किमान 20 टक्के आर्द्रता गरजेची आहे. शिवाय हे तंत्रज्ञान थंड प्रदेशात निरुपयोगी आहे. ‘अ‍ॅटमॉस्फेरिक वॉटर जनरेशन’ युनिट्समधील उत्पादकतेत त्वरित वाढ करणे देखील सहज शक्य नाही. उदाहरणार्थ, तुमच्या युनिटची उत्पादन क्षमता प्रतिदिन 30 लिटर असेल आणि अचानक घरी जास्त माणसे आली किंवा तुमचीच पाण्याची मागणी वाढली तर हे तंत्रज्ञान तात्काळ क्षमतेपेक्षा अधिक पाण्याचे उत्पादन करू शकत नाही.

इस्रायलच्या भूभागाच्या अंदाजे 61% भाग वाळवंट किंवा जवळ-वाळवंट म्हणून वर्गीकृत केला आहे, नेगेव वाळवंटाने देशाच्या भूभागाचा महत्त्वपूर्ण भाग व्यापला आहे. नेगेव 12,000 चौरस किलोमीटर (4,633 चौरस मैल) पेक्षा जास्त पसरलेला आहे, जो इस्रायलच्या एकूण भूभागाच्या अर्ध्याहून अधिक क्षेत्र व्यापतो.

अशी रखरखीत परिस्थिती असूनही, इस्रायलने वाळवंटी क्षेत्रांना उत्पादक शेतजमिनीत रूपांतरित करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण जल व्यवस्थापन तंत्रांचा प्रभावीपणे वापर करून, जमीन सुधारणे आणि कृषी विकासामध्ये उल्लेखनीय प्रगती केली आहे. देशाच्या वाढत्या लोकसंख्येला आणि अर्थव्यवस्थेला पाठिंबा देण्यासाठी हे परिवर्तन महत्त्वपूर्ण ठरले आहे.