AgricultureGovt. Scheme

पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी 50 टक्के सबसिडीवर 50 लाख रूपये कर्ज, केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेबद्दल माहिती आहे का? Poultry Farm Business

ग्रामीण भागात पोल्ट्री फार्म उघडण्यासाठी केंद्र सरकार 50 टक्क्यांच्या सबसिडीसह 50 लाखापर्यंत कर्ज देते. परंतु बहुतांशी शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ कसा मिळवायचा, यासाठी यासाठी कोण पात्र आहे आणि या योजनेसाठी अर्ज कसा करायचा हे जाणून घेऊ…

Poultry Farm Business

केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्धविकास खात्याअंतर्गत राष्ट्रीय पाळीव पशू कार्यक्रम राबवण्यात येतो. केंद्र सरकारने देशातील मांस, दूध आणि अंड्यांच उत्पादन वाढवण्याच्या हेतूने ही योजना सुरू केली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात भारतात 129 अब्ज अंड्यांचे उत्पादन झाले. केंद्र सरकारला हे उत्पादन अजूनही पुढे वाढवायचे आहे.

पोल्ट्री फार्मसाठी काय आहे ही योजना?

ग्रामीण भागात पोल्ट्री फार्म विकसित करण्यासाठी सरकारकडून 50 लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. यावर 50 टक्के सबसिडी मिळते. उदाहरणार्थ जर तुम्ही 50 लाखाचे कर्ज घेतले तर तुम्हाला 25 लाख परत करावे लागतील. पण हे पैसे त्या संबधित बँकेत दोन हप्त्यात जमा करावे लागतील.

पोल्ट्री फार्मसाठी कर्ज कोणाला मिळू शकतं?

या योजनेअंतर्गत कोणतीही व्यक्ती, बचत गट, उद्योजक, शेतकरी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था, कंपनी कायद्याच्या कलम 8 अंतर्गत स्थापन झालेल्या संस्था यापैकी कोणालाही कर्ज मिळू शकते. या योजनेसाठी कोणतीही राष्ट्रीयकृत बँक कर्ज देते.

पोल्ट्री फार्मच्या कर्जासाठी अर्ज कसा करायचा?

या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. यासाठी सरकारने खास राष्ट्रीय पाळीव पशू मिशन पोर्टल (नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन पोर्टल) सुरू केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्ज घेणाऱ्याच्या नावावर कमीत कमी एक एकर शेतजमीन हवी. यासंबंधित कागदपत्र अर्जाला जोडणे गरजेचे आहे. जर तुमची स्वतःची जमीन नसेल तर लीजवर घेतलेल्या जमिनीवरही कर्ज घेता येते पण अशा वेळेस हे कर्ज तुम्ही आणि जमीन मालक दोघांच्या नावाने दिले जाते.

या योजनेअंतर्गत कर्ज घेण्याआधी एक सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करावा लागतो. पोल्ट्री फार्मची योजना काय आहे हे यात विशद करावे लागते आणि हा फॉर्म ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करावा लागतो.

पोल्ट्री फार्मच्या कर्जासाठी कोणती कागदपत्रं लागतात?

  • सविस्तर प्रकल्प अहवाल
  • आधार कार्ड
  • पोल्ट्री फार्म उभे करायचे आहे त्या जागेचे फोटो
  • जमिनीची कागदपत्रे
  • पॅन कार्ड
  • मतदान ओळखपत्र
  • ज्या बँकेतून कर्ज घ्यायचे आहे त्या बँकेत असलेल्या तुमच्या खात्याचे दोन कॅन्सल चेक
  • रहिवासी दाखला
  • आवश्यक फॉर्म
  • जात प्रमाणपत्र (गरजेचे असल्यास)
  • कौशल्य प्रमाणपत्रे
  • स्कॅन सही

एकदा कागदपत्रांची जुळवाजुळव झाली की नॅशनल लाईव्हस्टॉक पोर्टलवर जाऊन आपला यूझर आयडी आणि पासवर्ड बनवावा. त्यासाठी nlm.udayanidhimitra.in/Login या पोर्टलला भेट द्यावी. अर्ज केल्यानंतर तुमचा अर्ज कोणत्या स्टेजला आहे याची माहिती देखील तुम्हाला याच पोर्टलवर मिळेल.

पोल्ट्री फार्मच्या कर्जासाठी अर्ज करताना काय काळजी घ्याल?

लॉगिन करण्याचा प्रयत्न केल्यावर तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल. आपली सगळी कागदपत्रे नीट असावीत ही काळजी घ्यावी. तसेच नक्की किती कर्ज हवे आहे हे अर्ज करतानाच नमूद करावे. तुमचा प्रकल्प अहवाल सर्वात महत्त्वाचा आहे. यात तुम्हाला नेमक्या किती कोंबड्या पाळायच्या आहेत, त्यांच्या पालनासाठी किती खर्च येणार, त्यांना खाऊपिऊ घालण्याचा खर्च किती हे सगळे नीट नमूद केलेले असावे. तसेच ही सर्व माहिती खरी असावी. पडताळणी दरम्यान कोणतीही माहिती खोटी किंवा संशयास्पद आढळली तर तुमचा अर्ज रद्द केला जाऊ शकतो.

सिबील स्कोर गरजेचा?

केंद्र सरकारच्या वतीने सुरू असलेल्या या योजनेच्या माध्यमातून पोल्ट्रीसाठी कर्जाचा लाभ घ्यायचा असल्यास, तुमचा सिबील स्कोर चांगला असणे आवश्यक आहे. सिबील स्कोर चांगला असल्यास बँका कर्ज देण्यास लगेच तयार होतात, अन्यथा कर्जाचा प्रस्ताव नाकारला जातो.

कुक्कुटपालनासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता

कुक्कुटपालन हा व्यवसाय जोखमीचा आहे. त्यामुळे या व्यवसायात उतरताना प्रशिक्षण घेणे फार गरजेचे असते. कोंबड्यांचे संगोपन, त्यांची निगा कशी राखावी, त्यांचे आरोग्य व्यवस्थापन, रोग आणि आजार तसेच त्यावरील उपाययोजना, कोंबड्यांचे खाद्य व्यवस्थापन या सर्व गोष्टींची माहिती असणे फार गरजेचे आहे.

या कर्जासाठी स्थानिक भागात कोणाला संपर्क करावा लागेल?

ही योजना जरी केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवली जात असली तरी, ही योजना राबवण्यासाठी राज्य सरकार नोडल एजन्सी म्हणून काम करते. ऑनलाईन अर्ज केला तरी तुमचे अर्ज याच नोडल एजन्सीव्दारे बँकांपर्यंत पोहचवले जातात. अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या पशुसंवर्धन अधिकाऱ्यांशी संपर्क करू शकता. तसेच ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी त्यांची मदत घेऊ शकता.

Back to top button