गोव्यातील नवीन फिल्मसिटीत 5 हजार नोकरीच्या संधी | Goa Film City Jobs
पणजी | गोव्यात गेल्या काही दिवसांपासून फिल्म सिटीबाबतची चर्चा सुरू आहे. फिल्मसिटीसाठी जागेचा शोध सुरू असल्याचे समोर आल्यानंतर अनेक ठिकाणांहून याला प्रतिसाद मिळाला. या प्रकल्पातून सुमारे 5,000 रोजगार उपलब्ध होतील, असे सांगत काणकोणमधील 10 लाख चौरस मीटर जागा निश्चित्त केल्याचे सांगितले. फिल्मसिटी ही माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांची संकल्पना होती.
Goa Film City Jobs
गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी त्यांचा मतदारसंघ असलेल्या काणकोण येथे फिल्मसिटी व्हावी, त्यासाठी आवश्यक त्या सोयी पुरविण्याबाबत कटिबद्धता व्यक्त केली होती. त्यानंतर आता समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी या प्रकल्पातून सुमारे 5,000 रोजगार उपलब्ध होतील, असे सांगत काणकोणमधील 10 लाख चौरस मीटर जागा निश्चित्त केल्याचे सांगितले.
फळदेसाई म्हणाले की, फिल्मसिटी उभारल्यानंतर पहिल्या पाच वर्षातच किमान 5000 नोकऱ्या उपलब्ध होतील. त्याचा पर्यटन क्षेत्रावर आणि इतर संबंधित क्षेत्रांवरही सकारात्मक परिणाम होईल. सरतेशेवटी त्याचा फायदा राज्यालाच होणार आहे.
या प्रकल्पासाठी काणकोण येथील भगवती पठाराजवळ सुमारे 10 लाख चौरस मीटर जागा निश्चित्त केली आहे. ही जागा कोमुनिदादची आहे. फिल्मसिटी ही माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांची संकल्पना होती. काणकोणमधील स्थानिकांनाही फिल्मसिटीची उत्सुकता आहे.