Farmer Protest : आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी दुसरी रात्रही थंडीत हरियाणा-पंजाबमधल्या शंभू सीमेवर काढली. सरकारने चर्चा करण्याचा प्रस्ताव शेतकऱ्यांना पाठवला आहे. पण शेतकरी नेत्यांचं म्हणणं आहे की कोणत्याही ठोस प्रस्तावाशिवाय चर्चेतून काहीही साध्य होणार नाही.
शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केलं की बुधवारी, 14 फेब्रुवारीला केंद्राच्या कोणत्याही मंत्र्यासोबत बैठक झालेली नाही. ही बैठक गुरुवारी, 15 तारखेला होईल. शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल यांनी म्हटलं की, गुरुवारी संध्याकाळी सरकारच्या प्रतिनिधी मंडळासोबत बैठक होईल.
बुधवारी दुसऱ्या दिवशी पोलिसांनी ड्रोन्स उडवले तर शेतकऱ्यांनीही पतंगी उडवून ड्रोन पाडण्याचा प्रयत्न केला. पंजाबच्या दिशेकडील महामार्गावर शेकडो ट्रक्टर उभे करण्यात आले आहेत. आजही शेतकऱ्यांनी बॅरीकेड्स आणि सिमेंटचे ब्लॉक्स ट्रॅक्टरने सरकवण्याचा प्रयत्न केला. बुधवारी सकाळी शेतकरी अधिकच आक्रमक झाल्याने हरयाणा पोलिसांनी ड्रोनमधील अश्रुधुराच्या नळकांड्या आणि रबरी गोळ्यांचा वर्षाव केला. मंगळवारीही हीच परिस्थिती होती. ड्रोनला प्रत्युत्तर म्हणून शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. यात पोलीस उपअधीक्षकासह तब्बल 24 पोलीस जखमी झाले, तर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात आंदोलकांचीही डोकी फुटली आहे.
पुढचे दोन दिवस हरयाणा सरकारने अंबाला, कुरुक्षेत्र, कैथल, जिंद, हिसार, फतेहबाद आणि सिरसा या सात जिह्यांमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा बंद ठेवली आहे. तसेच पंजाब सरकारने शंभू आणि खनौरी सीमेवरील रुग्णालय परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात ठेवला आहे.
शेतकरी नेत्यांसोबत सरकारच्या वतीने आज बैठक
केंद्रीय कृषिमंत्री अर्जुन मुंडा, केंद्रीय अन्न आणि पुरवठा मंत्री पीयूष गोयल यांची शेतकरी नेत्यांसोबत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात येणार आहे.
मोदी एमएसपीच्या गॅरंटीपासून का पळताहेत? काँग्रेस
मोदी सरकारने दोन वर्षांपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. शेतकऱ्यांचा विश्वास त्यांनी गमावला आहे. मोदी किमान आधारभूत कायद्याच्या गॅरंटीपासून का पळताहेत, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. तर मोदी सरकार हे शेतकऱ्यांसोबत हुकूमशहासारखे वागत असल्याची तोफ काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आंदोलकांशी बोलताना डागली.
शेतकऱ्यांना गुन्हेगारांसारखे वागवू नका
आपल्या हक्कांच्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी वाटेल ते केले जात आहे. बॅरीकेड्स, खिळे ठोकले जात आहेत. वर्तमानपत्रांतून बातम्या येत आहेत, त्यांच्यासाठी तुरुंगही तयार केला जात आहे. हे अत्यंत भयानक असून ते शेतकरी आहेत गुन्हेगार नाहीत, अशा शब्दांत भारतरत्न एम.एस. स्वामिनाथन यांची मुलगी कृषी अभ्यासक, तज्ञ मधुरा स्वामिनाथन यांनी मोदी सरकारला बोल सुनावले आहेत.
माझी सर्व वैज्ञानिकांना विनंती आहे की, अन्नदात्यांशी बोला, चर्चा करा, त्यांचे प्रश्न सुटतील. त्यासाठी प्रयत्न करा, असेही त्या म्हणाल्या. एम.एस. स्वामिनाथन यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल आयोजित कार्यक्रमात मधुरा स्वामिनाथन व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत होत्या.
“ब्रिटिशांनीही अशी दमनशाही केली नाही”
किमान हमीभावासाठी देशातील शेतकरी राजधानीच्या दिशेने कूच करत आहेत. त्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर तोफा, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. पाण्याचा मारा केला जातोय. रस्त्यावर खिळे ठोकलेले आहेत. गोळीबार करण्यासाठी पोलीस सज्ज आहेत. शेतकऱ्यांची वाहनं अडवली जात आहेत. काही ठिकाणी पक्क्या भिंती उभ्या केल्या आहेत. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान ब्रिटिशांकडूही अशा पद्धतीची दमनशाही करण्यात आली नव्हती. तशा प्रकारची दमनशाही मोदी सरकार शेतकऱ्यांविरोधात करत आहे. ब्रिटिशांच्या काळातही शेतकरी आंदोलन करायचे. त्यांचे नेतृत्व लाला लजपतराय यांनी केले होते, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
शेतकऱ्यांची नेमकी काय मागणी?
स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींनुसार एमएसपीवर तात्काळ कायदा करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. तर कायदा बनवण्याची प्रक्रिया इतक्या लवकर पूर्ण होऊ शकत नाही, असं सरकारचं म्हणणं आहे. केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांनी म्हटलं आहे की, “ज्या कायद्याबद्दल बोललं जात आहे, त्याबाबत कोणताही निर्णय पुढील काळात सर्वांच्या परिस्थितीचा विचार न करता अशा प्रकारे घेतला जाऊ शकत नाही, हे शेतकरी संघटनांनी समजून घेतले पाहिजे. आपण सर्व बाबींची काळजी घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सामान्य जनजीवन कोणत्याही प्रकारे विस्कळीत होऊ नये याची काळजी शेतकऱ्यांनाही घ्यावी लागेल.”
शेतकऱ्यांची ‘चलो दिल्ली’ची घोषणा
दोन शेतकरी संघटना आणि संयुक्त किसान मोर्चाने ‘चलो दिल्ली’ आंदोलनाची हाक दिली आहे. यासह या शेतकरी संघटनांनी 13 फेब्रुवारीपासून दिल्लीच्या दिशेने कूच सुरु केलं आहे. दरम्यान, या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. वर्षभरापूर्वी शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर आक्रमक आंदोलन केलं होतं, ज्यामुळे सरकारला नमत घेत नवीन कृषी कायदे रद्द करावे लागले होते, त्यामुळे आता सरकार कडून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर पोहोचू नयेत यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. यासोबतच शेतकऱ्यांनी 16 फेब्रुवारीला ग्रामीण भारत बंदची हाकही दिली आहे.