News

छगन भुजबळांच्या राजीनाम्यावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..

मुंबई | अन्न व पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी काल (4 फेब्रुवारी) अहमदनगर येथे झालेल्या ओबीसी एल्गार सभेत मोठा गौप्यस्फोट केला. मी 16 नोव्हेंबर रोजीच मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचं ते म्हणाले. 17 नोव्हेंबर रोजी अंबड येथे पहिली ओबीसी एल्गार सभा झाली. त्या सभेला जाण्याआधीच म्हणजेच 16 नोव्हेंबर रोजी मी राजीनामा दिला होता असे त्यांनी सांगितले आहे.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्यापासून राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले आहेत. भुजबळांनी राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात भूमिका घेतली आहे. नोंदी असलेल्या मराठा समाजातील लोकांना कुणबी जातप्रमाणपत्र देण्याच्या तसेच त्यांच्या सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्याच्या अध्यादेशाविरोधात भुजबळ यांनी दंड थोपटले आहेत. दरम्यान, छगन भुजबळ यांनी अहमदनगर येथे ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात बोलताना भुजबळ यांनी त्यांच्या राजीनाम्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला.

छगन भुजबळ म्हणाले, सरकारमधले काही लोक, विरोधी पक्षातले काही नेते माझ्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. विरोधक मला म्हणतायत की, सरकारचे निर्णय पटत नसतील तर राजीनामा द्या. सरकारमधील एक आमदार म्हणाले, छगन भुजबळच्या कमरेत लाथ घालून त्याला मंत्रिमंडळाबाहेर काढा. मला या सर्वांना, माझ्या विरोधकांना, स्वपक्षातील आणि स्वसरकारमधील लोकांना सांगायचं आहे की मी १६ नोव्हेंबरलाच राजीनामा दिला आहे. अंबड येथे १७ नोव्हेंबर रोजी ओबीसी एल्गारची पहिली रॅली पार पडली. त्या रॅलीच्या एक दिवस आधी, म्हणजेच १६ नोव्हेंबर रोजी मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

छगन भुजबळ यांनी जो गौप्यस्फोट केला त्यानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत प्रतिक्रिया देत, भुजबळांच्या राजीनाम्याबद्दल केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगू शकतील. मी एवढंच सांगेन की आम्ही त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही किंवा मुख्यमंत्र्यांनीदेखील भुजबळांचा राजीनामा स्वीकारलेला नाही.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी गप्प राहण्यास सांगितले

ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळाव्यात छगन भुजबळ म्हणाले, की राजीनामा दिल्यानंतरही मी अडीच महिने शांत राहिलो. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार मला म्हणाले की याची कुठेही वाच्यता करू नका.

Back to top button