मुंबई | राज्यभर चर्चेत असलेल्या तलाठी भरती (Talathi Bharti) परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या प्रकरणी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमून चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवार यांनी या प्रकरणी पुरावे सादर करावेत, ते मिळाल्यास परीक्षा रद्द करण्यात येईल, अशी भूमिका घेतली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पुण्यातील नवीन भाजप कार्यालयाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांना तलाठी भरतीत राज्यात मोठा गैरव्यवहार झाल्याचे आरोप करण्यात आल्याबाबत विचारणा करण्यात आली. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, तलाठी भरती परीक्षा ही राज्यात अतिशय पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली आहे. या परीक्षेत कोणताही गैरव्यवहार झाल्याचा पुरावा कोणीही दिल्यास त्याची चौकशी केली जाईल. पुरावे योग्य असल्यास चौकशी करून ही परीक्षा रद्द केली जाईल आणि दोषींवर कारवाईही केली जाईल.
तलाठी भरतीत गैरव्यवहार झाल्याचे आरोप
तलाठी भरती परीक्षेचा निकाल ५ जानेवारी रोजी जाहीर झाला आहे. तसेच भूमी अभिलेख विभागाने ६ डिसेंबर रोजी तलाठी अंतिम उत्तरतालिका जाहीर केली होती. तलाठी भरतीचा निकाल समोर येताच स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने निकालावर आक्षेप घेतला आहे. निकालामध्ये प्रचंड गोंधळ झाला असून जुन्या परीक्षेत नापास झालेले काही उमेदवार या परीक्षेत दोनशेहून अधिक गुण घेत उत्तीर्ण झाल्याचा आरोप केला आहे. तसेच ज्या काही उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत असे उमेदवार परीक्षेत पास झाल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे. त्यामुळे तलाठी भरती पुन्हा एकदा वादात सापडली आहे.
स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने त्यांच्या एक्स अकाऊंटवर केलेल्या पोस्टनुसार, दोन निकाल एकाच व्यक्तीचे आहेत. परीक्षांमध्ये पण फक्त १५ दिवसांचा गॅप आहे. वनरक्षक मध्ये ५४ गुण आणि तलाठीमध्ये २०० पैकी २१४ गुण घेऊन टॉप केलं आहे. यावरून समजून जावे की, पेपर कसे झाले आणि मार्क कसे पडले. ९९ टक्के जागा विकल्या आहेत. सर्व निवड झालेल्या मुलांची न्यायालयीन एसआयटीमार्फत चौकशी झाली पाहिजे. तसेच या सर्व मुलांनी कोणत्या सेंटरवर पेपर दिला आहे आणि यांची रॉ मार्क किती आहेत हे सर्वांना समजले पाहिजे. यांची सर्वांची सीसीटीव्ही पब्लिक करायला पाहिजे. सध्याचा सर्वात मोठा घोटाळा हा तलाठी भरतीमध्ये झाला आहे, असा आरोप केला आहे.