मुंबई | कंत्राटी कर्मचारी भरतीवरून राज्यभरात गदारोळ झाल्यानंतर राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारने कंत्राटी कर्मचारी भरतीचा जीआर अखेर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी फडणवीसांनी मविआ नेत्यांवर सडकून टीका केली.
देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी फडणवीस यांनी कंत्राटी कर्मचारी भरतीचा जीआर रद्द करण्यात येणार असल्याची माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. आधीच्या सरकारने केलेले पाप आमच्या माथी नको, असे बोलत त्यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले आहे.
“कंत्राटी कर्मचारी भरतीवरून राज्यातील तरुणांच्या मनात असंतोष निर्माण केला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे, 2003 मध्ये काँग्रेस- राष्ट्रवादी सरकारच्या काळातच कंत्राटी कर्मचारी भरतीला सुरुवात झाली होती. यानंतर अशोक चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री असताना दोन वेळा कंत्राटी भरती काढण्यात आली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनीही कंत्राटी भरतीची निविदा काढली. मात्र, आता हेच लोक स्वत:चे पाप आमच्या माथी फोडण्याचा प्रयत्न करु लागले आहेत. यामुळे आम्ही कंत्राटी कर्मचारी भरतीचा जीआर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे”, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.