जनरल डबा, स्लीपर आणि एसी.. किती जमीन-आस्मानचा फरक… एकाच झटक्यात सगळा ‘भारत’ दिसतो..!
नाशिक रोडवरून मुंबईला येण्यासाठी रात्री पवन एक्स्प्रेससाठी थांबले होते. माझ्या सोबतीला पायाला पोलिओ झालेली एक व्यक्ती. त्यांच्याकडे अपंग सर्टिफिकेट मूळ प्रत असूनही काहीतरी कारण सांगून सवलत तिकीट दिलं नाही. मी खूप भांडले त्या कर्मचाऱ्यांशी. ‘मदत तर करतच नाहीत, पण त्या व्यक्तीचा हक्कही देत नाही. एका अपंग व्यक्तीची विनाकारण अडवणूक केली म्हणून रात्री झोप यायला नाही पाहिजे, आरशात स्वतःला पाहिल्यावर वाईट वाटायला हवं वगैरे वगैरे’. काही फायदा झाला नाही. मला माहिती आहे अशी माणसं शांत झोपतात.
माझ्या सोबतची व्यक्ती भांडली नाही, शांत होती. रोज मरे त्याला कोण रडे. त्यांच्या तिकिटाचे पैसे मी भरले होते, तरीही ते सारखे ‘सवलत तिकीट मिळायला हवं होतं ‘ म्हणत होते. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतो आहे असं वाटत असणार त्यांना. आम्ही दोघे प्लॅटफॉर्मवरील एक एक थंड समोसा खाऊन थंडपणे ट्रेनची वाट पाहत बसलो. विद्रोह असाच मरत असेल हळूहळू.
ट्रेन दीड तास लेट. नऊची गाडी साडेदहाला आली. बऱ्याचदा अपंग डबा मागं येत असल्यानं आम्ही तिथं बसलो. अपंग नसेल तर सध्या डबा तिथेच येत होता. एकदाची गाडी आली. प्लॅटफॉर्मवर गाडी येताना असं दिसलं की तो डबा सगळ्यात पुढे गेला आहे. आम्ही “जाऊ दे” म्हणून साध्या डब्यात बसायचं ठरवलं. पण त्यात दरवाज्यापर्यंत माणसेच माणसे कोंबलेली दिसली. मग आम्ही थोडे चाललो, ट्रेन सुरु होईल असं वाटल्यानं आम्ही समोर जो एसी डबा होता त्यात चढलो. त्यात गर्दी नव्हती. एक एक डबा पार करत स्लीपरच्या डब्यात आलो. स्लिपरच्या डब्यातील चित्र पाहून मी हबकले. आत शिरायलाच तेवढी जागा, तीही माणसांना ढकलून बनवावी लागत होती. एका एका सीटवर चार चार माणसे बसलेली, किमान दोन झोपलेली. दोन डब्यांच्या मध्ये सामान, माणसे अक्षरशः कोंडलेली. टॉयलेट्सशेजारी उसे करून मुले, माणसे झोपलेली. टॉयलेट शेजारचे बेसिन घाणीने भरलेले. त्याखालीही सामान, माणसे. सगळीकडे नुसतीच माणसेच माणसे पसरलेली, जागा नसणारी, रिझर्व्हेशन नसणारी. बहुतांश सगळी एकाच जमातीची, गरीब.
“ये तो कुछ भी भीड नही है, होली के टाईम पर तो बहोत ज्यादा भीड होती है… मैं हमेशा ऐसेही जाता हुं,” टॉयलेटला चिकटून उभा असलेला एक तरुण म्हणाला.
आम्ही दोघं अक्षरशः अनेकांना पाय लागत, चेंबत चेंबवत एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जात होतो. माझ्यापेक्षा माझ्या सोबतच्या व्यक्तीला चालायला जास्त त्रास होत होता, त्याला पाय अतिशय कष्टाने उचलून टाकावा लागत होता. शिवाय रस्त्यात अनेक बायका, मुले, मुली झोपलेले. अंथरूण नाही, पांघरून नाही, डब्याच्या घाण जागेवर देहाचा मुटकुळा करून पडलेले. पुरूषही असे झोपलेले जणू खूप दिवसांची झोप घेत असावेत. गाढ(उजेडात आणि आवाजात झोप येत नाही हे पांढरपेशे चोचले बनून राहतात अशावेळी). त्या सगळ्यांना ओलांडून जाणं अवघड, आव्हानात्मक होतं. पण एकाही व्यक्तीने एवढ्या गर्दीतून जाताना चिडचिड केली नाही. सगळे एकाच नावेचे प्रवाशी, अभाव आणि संघर्ष. नाही रे गटातील. ॲडजेस्टमेंट सगळ्यांना समजत होती. संघर्ष जोडून ठेवतो म्हणे माणसांना.
एक काका फक्त म्हणाले की रेल्वेला कितीतरी वेळा यांना स्लीपरमध्ये येऊ देऊ नका म्हणून तक्रार देऊन झाली आहे, काही होत नाही. तेही वेगळ्या पद्धतीने बळीच म्हणायचे. ट्रेनचा आरामदायी प्रवास ही साधी मूलभूत गरज, मात्र जनरल डबा, स्लीपर आणि एसी किती जमीन आस्मानचा फरक. एकाच झटक्यात सगळा भारत दिसतो. भावना आणि गरजा सारख्याच. जात, धर्माबरोबरच पैसा आयुष्याचं मोल ठरवतो.
मध्येच रेल्वेची पँट्री आली. आतले कर्मचारी जाऊ देत नव्हते तिथून. एका आर्मीच्या जवानाने त्यांना डाफरल्यावर आम्हाला रस्ता दिला. पँट्रीत सगळीकडे जेवण, चहाच्या किटल्या, घाणच घाण. लोकांच्या ताटात जे येऊन पडतं ते कुठून आणि कशा अवस्थेतून येतं हे पाहिल्यावर जेवण घरूनच न्यावं किंवा उपाशी राहावं वाटण्यासारखी स्थिती. कधीकाळी खावंच लागलं तर उलटी येऊ नये म्हणून फार न पाहता पुढे निघाले. तरी खालच्या नजरेतून बरंच काही दिसत होतं जे मनात कायमचं साचलं जात होतं.
आता लोकांना दाबून, दबून, पाय उचलून चालून दोघेही थकलो. बरेच डबे चाललो होतो. विचारपूस केल्यावर कळलं की अजून पाच डबे राहिले आहेत. पुढचे स्टेशन अर्ध्या तासात येणार होते. तिथेच एका बाजूला शरीर आवळून उभे राहिलो. टेकायची जागाही कोणाला मागू शकत नव्हतो. आधीच लोक अत्यंत दाटीवाटीने बसलेले. सीटवर, सीटच्या एका बाजूला, दोन सीटच्या मध्ये, रस्त्यात. लोक स्वतःच इतके पीडित होते की दुसऱ्यावर दयामाया करायचे त्राणही गमावून बसलेले. अशा वेळी इतरांना मदत करणं चंगळवादच म्हणायचा.
पुढचं स्टेशन आल्यावर भराभर चालत आम्ही हॅण्डीकॅप डब्याकडे निघालो. मला सोबतच्या व्यक्तीबद्दल काळजी वाटत होती. माझेच एवढे पाय दुखायला लागले होते, त्याला किती त्रास होत असणार. तसं विचारलंही मी त्याला. तो काहीच बोलला नाही. डब्यासमोर पोहोचल्यावर दिसलं की डबा आतुन बंद केलेला. उघडेना कुणी. शेवटी माझ्या सोबतचा व्यक्ती अपंग आहे हे कळल्याने आतून दरवाजा उघडला गेला. आम्ही वर चढून पाहतो तर तिथे पुढे पाय ठेवायलाही जागा नव्हती. आम्ही दरवाज्यातच उभे. काही लोकांनी आम्हाला आत जायला जागा करून दिली. कसंतरी करून माझ्या सोबतच्या माणसाला त्यांनी फक्त टेकायला जागा करून दिली.
आतल्या चार सीटवर, डब्यात मिळून किमान ३०/३२ लोक होते. त्यात एक अंध (मुस्लिम ज्याने चार दिवसांच्या प्रवासात एकच समोसा पाव खाल्लेला), एकाचा हात पोलिओत गेलेला अशा दोघांनाच अपंग म्हणून जागा मिळालेली. एकाचे दोन्ही पाय पंजापासून तुटलेले, तो माणूस बिहार मधूनच बसलेला. त्यालाही कुणी जागा दिली नव्हती, ते गुमान खाली बसलेले. वंचितता, सत्ताहीनता तुमच्या लढण्याची ताकद काढून घेते.
सहा महिन्याच्या बाळाला सीटवर टाकून एक विशीतील मुलगी तिच्या शेजारी बसलेली. गळ्यात तावीज बांधलेला. हातपाय सुक्या बोंबिलासारखे. तिचा नवरा खूप आजारी आहे आणि तो दवाखान्यात जात नाही म्हणून तिला दिर गावाकडून घेऊन आलेला. तिच्या बाळासमोर, सीटच्या काठावर एक महिला तोंडाला ओढणी बांधून बसलेली. तिच्या बाजूला पाच सहा पंचविशीतील तरुण बसलेले. एकाच्या हातात महाकाल लिहिलेलं बँड घातलेलं. एकाची राम राम रिंगटोन. एकाने भगवा गमछा कमरेला गुंडाळलेला. सगळ्यांच्या तोंडात गुटखा नाही तर तंबाखू. दात खराब झालेले. “हम पैसा देके बैठे है” म्हणाले. एकदा पोलीस येऊन गेले होते म्हणे. पण काहीच न बोलता निघून गेले. समोरच्या बाकावर सात जण, त्यात एक नऊ वर्षांचा मुलगा. तो सारखा मान इकडे तिकडे टाकून झोपलेला. माझं ‘ अति संवेदनशील ‘ मन त्याच्या आई बापाला शोधू लागलं(संवेदनशीलता महाग असते, प्रत्येकाला परवडत नाही हे लोकांसोबत काम करताना लोकांनी शिकवलेलं.). त्याचे वडील खाली बसलेले. मी म्हणालं, “कसा झोपला आहे तो. त्याच्या मानेला त्रास होईल, तुमचं लक्ष नाही का?” ते उठले, पण काय करणार? तसेच उभे राहिले. मी त्या पाच मोबाईलवर गेम खेळत बसलेल्या मुलांना झापले. लहान मुलाला झोपायला जागा नाही आणि तुम्ही निवांत बसला आहात म्हणाले.”अरे हम सभी दरिया गंज से साथ मे आये है. हम रखे है खयाल सबका, ई बच्चे का भी” असं म्हणत त्यांनी त्या मुलाशेजारच्या पुरुषाला शिव्या देऊन, ओरडून थोडी जागा मुलासाठी करून दिली. मुलगा जागेवरच थोडा आडवा होऊन झोपला, तो दुसरा माणूस त्याच्या अंगावर रेलून झोपून गेला. सीटवरचे, खाली बसलेले जवळ जवळ सगळे दोन रात्री दोन दिवस प्रवास करत आलेले. त्या मुलांना तरी काय बोलणार, एवढ्या लांबच्या प्रवासात किती ॲडजस्टमेंट करणार? केलीही असेल त्यांनी, काय माहित?
मी अनेकदा साध्या डब्यात, गर्दीत रात्रभर पण प्रवास केला आहे. कधी बसून, कधी उभ्यानं. आयुष्यात स्लीपर कोच उशिरा आला आणि एसी तर आता आता, तेही गरजेनुसार. मात्र अशी गर्दी आणि मानवी देहांची हेळसांड पाहिली आणि अनुभवलीही नव्हती. एका मानसिक धक्क्यात शिरले होते. डोळे आपोआप पाणावले होते. मी उभीच होते. कुणाला जागा द्या म्हणणार, जागाच नव्हती. त्या समोरच्या ताईने त्या पाच मुलांना “तमीज नही है, औरत खडी है, बच्चे को जगह नही; लेकीन ये लोग आराम से बैठे है, संस्कार ही नही है.” मुलं शांत; डोळ्याला डोळा न भिडवता इकडे तिकडे पाहू लागले.
थोड्याच वेळात ते सगळे आपआपल्या मोबाईलवर आयो सीयो, हाय हाय चुनरी तेरी आणि तत्सम रिल्स बघत बसले. असे सगळे व्हिडीओ ज्यांचा त्यांच्या भूत, वर्तमान किंवा भविष्याशी काहीही संबंध नसणार आहे, मात्र वास्तव, संघर्ष, अन्याय, वंचितता विसरायला लावणारे रिल्स. सोबतीला मन मशीन बनवणाऱ्या शूटिंग गेम्स खेळणं.
मी जवळजवळ चार तास उभी. कधी एका पायावर तर कधी दुसऱ्या. हातातली एक बॅग सोबतच्या दादाकडे सोपवली. थोड्या वेळाने मोठ्या माणसांच्यात चेंबून झोपलेला मुलगा उठला. डोळे चोळत बाबाला म्हणाला, “पापा, आप बैठ जावो.” वडील म्हणाले, ” नही, तुम ही बैठो. मैं यही ठीक हूं.” तरी नऊ वर्षांचं लेकरू वडिलांना जागा देण्यासाठी उठलं. डोळ्यांवर झोपेची झापड होती. ते वडिलांना बसा म्हणत असतानाच दुसरा एक उभा माणूस तेवढ्या जागेत अधांतरी बसला. तो मुलगा आपल्या वडिलांशेजारी खाली बसला, दोन्ही गुडघ्यात डोकं खुपसून. काय विचार करत होता तो कुणास ठाऊक?माझ्या डोळ्यासमोर माझा मुलगा आला. दोन सीटचं तिकीट घ्यायला लागू नये म्हणून तो पाच सहा वर्षांचा होईस्तोवर सीटिंगच्या एकाच सीटवर रात्रभर हातावर, अंगावर घेऊन अनेकदा प्रवास केलेला. जास्तीत जास्त त्याला कधीकधी ट्रॅव्हल्सच्या मधल्या चालण्याच्या भागात अंथरूण टाकून झोपवलेलं. आता कदाचित त्याचं वेगळं तिकीट घेऊ शकते. बस्स इतकंच. ओळीने सगळेच व्यवस्थेचे बळी.
गाडीतील बहुतांश सगळे दोन दिवस दोन रात्री प्रवास करणारे. काय खाल्लं असेल? पाणी कुठलं प्यायले असतील? आंघोळ तर अशक्य आहे. टॉयलेट इतके खराब असतात की थोडा वेळ आत बसवत नाही. सहा महिन्यांच्या बाळाच्या आईने काय खाल्लं असावं एवढ्या वेळात? त्यातलं सकस किती असेल की बाळासाठी दूध येईल तिला? त्या नऊ वर्षांच्या लेकराने काय खाल्लं असावं? त्याने स्टेशनवरच्या वस्तू पाहून काही खायचा हट्ट केला असेल का?खाली बसलेल्या बापाने त्याचा हट्ट पुरवला असेल का?
गाडी मध्येच थांबली. अर्धा तास झाला. का थांबली, कधी निघणार कुणालाच माहिती नव्हतं. ते पुकारून सांगणं रेल्वेच्या सेवेत बसत नाही. एवढी सेवा करणार नागरिकांची? एवढं महत्त्व दिलं लोकांना तर डोक्यावर नाही का चढून बसणार?समोरच्या ताईला माझी दया आली, तिने बाळाच्या पुढे बसलेली तिची चार मूठ जागा दिली. कशीतरी टेकले. कंबर, पाठ इतकी ताठलेली की बसता येईना. अंगभर कळ आली. चार तासाने जर माझी अशी हालत असेल तर या सगळ्यांचं काय काय आणि किती किती दुखत असेल असा विचार आला.
मला कडकडून भूक लागलेली. डोकं दुखायला लागलेलं. बॅगमध्ये स्टेशनवर ‘असावं सोबत काहीतरी’ म्हणून घेतलेले तीन छोटे बिस्कीट पुडे होते. दोन त्या लहानग्याला देऊन एक मी खाल्ला. आजूबाजूच्या एक दोघांना खाण्यासाठी पुढे धरला पुडा, कुणी घेतलं नाही बिस्कीट. पिटुकल्याला घे म्हणाले, तो घेत नव्हता. आग्रह केल्यावर घेतलं. त्याने त्या लहान बाळाच्या आईला, चुलतीला पण आग्रहाने दिलं. तो खात असतानाच त्या मोठ्या मुलांनी त्याला गेम खेळायला दिली. त्या मुलाच्या मांडीवर बिस्कीट पुडा उघडलेला तसाच राहिला. मी त्याच्या वडिलांना “उसको बडे लडकोंके साथ मत खेलने देना” सांगितलं. ते हो म्हणाले, मुलगा खेळत बंदुकीने माणसे मारत राहिला. त्याने सांगितले तो आजवर कधीच शाळेत गेला नाही कारण घरी दिवसभर कामात मदत करावी लागते.
गाडी पुढे येऊन पुन्हा एकदा बराच वेळ थांबली, काहीही सूचना न देता. शेजारचा एक मुलगा टॉयलेटला जाताना माझ्या सोबतच्या ताईला जागा देऊन गेला. एवढ्याशा जागेत तिने आपला देह गुंडाळून बसवला. कमी जागेत बसून शरीर ताठून गेलेलं. आता बसायलाही नको वाटत होतं. पण उभं राहायला जागाच नव्हती. साधारण अर्ध्या तासानं गाडी पुन्हा सुरू झाली. रात्रीच्या बारापर्यंत पोहोचणारी मी पहाटे चार वाजता पोहोचले. त्यावेळी लोकल ट्रेन बंद.
सुरक्षा आणि गरज म्हणून ओला बुक केली. मोबाईलची बॅटरी ७% राहिलेली. गाडीचा ड्रायव्हर दुसऱ्या बुकिंगच्या बदल्यात आलेला ज्याची माहिती माझ्या बुकिंगमध्ये येत नव्हती.तरी बसले गाडीत. गुटख्याचा भपकन वास आला. “राईड पे गुटखा खाना मना हैं भैया” म्हणताच “ये तो मैने पहली बार आपसे सूना है” म्हणाला. “मैं वकील हुं, मुझे रुल्स पता है” म्हणताच गप्प बसला. हे ‘ वकील कार्ड ‘ वापरते कधीकधी. पण थोड्याच वेळात ‘ड्रायव्हरने राग येऊन मुलगी प्रवाशाचा केला खून, बदला म्हणून केला बलात्कार’ वगैरे मथळे डोक्यात यायला लागले. मग त्याच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली.”रात को काम करना पडता है इसलिये गुटखा खाता हुं..” चार वर्षांच्या मुलीबद्दलही तो भरभरून बोलत होता. त्याच्या बायकोला वॉचमनवर प्रेम झालं, त्याने तिला तलाक दिला, तिने वॉचमनसोबत लग्न केलं आणि ती आता त्रासात आहे. तिला परत यायचं आहे. मुलीसाठी तिला परत आयुष्यात घेऊ शकतो म्हणाला. माझी भीती निघून गेली. “मुझे अच्छा लगा आपने उनको तलाक दिया और अभीभी जिंदगी में वापस लेने का सोचते हो..”
पहाटे पाच वाजता पैसे देऊन त्याचे आभार मानून घरी पोहोचले. आजकाल माणसाची जीवंत राहण्याची अनिश्चितता इतकी वाढली आहे की प्रत्येक वेळी जीवंत आहोत याबद्दल माणसे आणि भवताल यांचे आभार मानावेसे वाटतात. पुढचे तीन दिवस डोळ्यातून पाणी निघेल अशी कळ पायातील शिरांमधून येत होती. कंबर, खांदा, पाठ, हात सगळं दुखत होतं. मानसिक धक्क्यातून बाहेर निघू शकत नव्हते.
दुसऱ्या दिवशी मी आराम करू शकत होते. ज्या डब्यात मी होते त्यातील सगळ्यांना दुसऱ्या दिवशी कामावर जावं लागणार होतं, कुणालाही आराम करता येणार नव्हता. त्यांचे पाय किती दुखले असतील की सवय झाली असेल दुखण्याची, न दुखण्याची, निबर होण्याची. मनंही सहन करून करून दगड झाली असतील का? त्यांची मनं नसतील झाली कदाचित, व्यवस्थेची नक्कीच झाली असतील. अशा ट्रेनधून प्रवास करणं, लोकांना प्रवास करताना पाहणं, आपण काहीही करू न शकणं आणि व्यवस्थेनं काहीही न करणं हे सगळंच माणसाने दगड होण्यासारखं आहे.
एकीकडे उत्सवी माहौल, तर दुसरीकडे पोटाची आग आणि जीवंत राहण्यासाठी प्रचंड संघर्ष. ॲडजस्टमेंट करायची एवढी सवय होऊन जाते की काही काळाने तो अन्याय आहे असं वाटणं बंद होऊन जातं आणि जे मिळतं आहे तेच खूप झालं असं वाटू लागतं. व्यवस्था हेच गॅसलायटिंग करते जनतेचं. शासन, सेवा, शिक्षण यांचं अल्गोरिदम लक्षात घ्यायला हवंय. ऑक्सफॅमची एक आकडेवारी वाचनात आली. २१ अब्जाधिशांकडे ७०% जनतेच्या एकूण संपत्तीपेक्षा जास्त संपत्ती, २०२१ मध्ये ५% भारतीयांकडे ६२% जास्त संपत्ती, देशातील ५०% लोकांकडे केवळ ३% संपत्ती.
आजकाल संघर्षाचं उदात्तीकरण नको वाटतं. व्यक्ती सहन करत असली तरी वेदना तर होतंच असते. फरक एवढाच असतो की संघर्ष सहन करणाऱ्याने आणि संघर्ष तयार करणाऱ्याने संघर्ष गरीब, वंचितांच्या बाबतीत गृहीत धरलेला असतो. हे बदलणं आपला अधिकार आहे हे सहन करणाऱ्यांना जोवर कळत नाही आणि आहे रे गटातील ‘सुखासीन’ लोक बदलासाठी पुढाकार घेणार नाहीत तोवर माणसांची अशी हेळसांड होत राहणार.
बदल होत नाही तोवर माणूस मोबाईलमधील उत्सव आणि रिल्समध्ये लोकशाही आणि विकास शोधत राहणार.
©लक्ष्मी यादव (Trainer at Gender, Sexuality, Communication, Human/ Women’s Rights)