News

आता व्हॉट्सॲप देखील प्रश्न विचारताच एका क्लिकवर देईल उत्तर.. जाणून घ्या ‘या’ नवीन फिचरबद्दल | WhatsApp META AI

AI तंत्रज्ञानाच्या जोरावर कठीणातील कठीण काम चुटकीसरशी होत आहेत. चॅट जीपीटी हे कृत्रिम बुद्धीमत्तेच्या जोरावर काम करणारं तंत्रज्ञान आहे. गणिताचा प्रश्न असो की आपल्या आरोग्याशी निगडित एखादी समस्या, चॅट जीपीटी यावर लगेच उत्तरं देतं. दरम्यान, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपची मालकी असलेल्या मेटा या कंपनीनेने देखील AI तंत्रावर आधारित मेटा एआय (Meta AI) नावाचं नवं फीचर आणलं आहे. मेटा एआयला चॅट जीपीटीप्रमाणेच तुम्ही प्रश्न विचारू शकता. हे फीचर अनेकांच्या व्हॉट्सअॅपवर दिसत आहे.

भारतात प्रायोगिक तत्त्वावर META AI लाँच

मेटा चे मेटा एआय (WhatsApp META AI) हे फीचर याआधीच अनेक देशात चालू आहे. यामध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, घाना, न्यूझिलंड, नायजेरिया, पाकिस्तान, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, युगांडा, झांबिया, झिंम्बाब्वे या देशांचा समावेश आहे. हे फीचर आता भारतातही आले असून सध्या ते प्रायोगिक तत्त्वावर चालू करण्यात आले आहे. या फीचरचा उपयोग वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यासाठी, समजून घेण्यासाठी, प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी करता येतो. 

काय आहे मेटा एआय? 

अनेकांच्या अपडेटेड व्हॉट्सअॅपवर सध्या मेटा एआय नावाचे नवे फीचर दिसत आहे. व्हॉट्सअॅपच्या उजव्या कोपऱ्यात न्यू चॅट ऑप्शनच्या वर निळ्या-जांभळ्या रंगाचं एक वर्तुळ दिसत आहे. ते वर्तुळ म्हणजेच नव्याने लाँन्च झालेले मेटा एआय हे फीचर आहे. या फीचरवर तुम्ही क्लीक केल्यावर चॅटिंगचा ऑप्शन खुला होतो. एखाद्या व्यक्तीला आपण ज्या पद्धतीने मेसेज करतो, अगदी त्याच पद्धतीने संदेशाच्या माध्यमातून या मेटा एआयला आपण वेगवेगळे प्रश्न विचारायचे. त्यानंतर मेटा एआय आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतं. मेटा एआयला काही विचारायचे असल्यास तुम्ही चॅट्स ऑप्शनमध्ये जाऊन वर सर्च बारमध्ये @MetaAI असं सर्च करू शकता. त्यानंतर लगेच तुम्हाला मेटा एआयशी चॅटिंगच्या मदतीने संवाद साधता येईल.

मेटा एआय इमेजही तयार करून देतं

मेटा एआय सध्यातरी शक्य त्या सर्व प्रश्नांची उत्तरं देत आहे. विशेष म्हणजे तुम्हाला एखादी इमेज हवी असेल तर तुम्ही दिलेल्या सूचनेप्रमाणे मेटा एआय तुम्हाला इमेजदेखील तयार करून देतं. ही नवी इमेज आपल्याला अवघ्या काही सेकंदांत तयार करून मिळते. या फीचरच्या मदतीने तुम्हाला हवा असलेला फोटो तयार करून तो इतरांना शेअरही करता येतो. 

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार सध्या हा ऑप्शन सर्वच व्हॉट्सॲपवर उपलब्ध नाही. हळूहळू सर्व वापरकर्त्यांना हा पर्याय उपलब्ध होणार आहे. तसेच इन्स्टाग्रामवरही मेटा एआय युजर्सना वापरता येत आहे. 

Back to top button