AgricultureNews

कोल्हापूरात कृषी अधिकारी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात, 9 हजाराची लाच घेणे अंगलट | Kolhapur Crime

कोल्हापूर | सेंद्रिय खतांच्या विक्रीच्या दुकानाचा परवाना देण्यासाठी नऊ हजारांची लाच घेताना (मंगळवारी) कृषी अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला आहे. सुनील जगन्नाथ जाधव (वय 50, सध्या रा. जाधववाडी, कोल्हापूर, मूळ रा. शाहूपुरी, सातारा) असे त्याचे नाव आहे. Kolhapur Crime

सुनील जाधव हा वर्ग दोनचा अधिकारी असून राजर्षी शाहू मार्केट यार्ड परिसरात सायंकाळच्या दरम्यान कारवाई करत त्याला अटक करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक सरदार नाळे यांनी दिली. तक्रारदाराने बियाणे, खते आणि औषधांची विक्री करण्यासाठी दुकानाचा परवाना मिळावा, अशी मागणी ऑनलाईन आणि ऑफलाईने अशा दोन्ही पद्धतीने जिल्हा कृषी कार्यालयाकडे केली होती.

अर्ज मंजूर करून पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठांकडे पाठवल्याबद्दल सुनील जाधव याने तक्रारदाराकडे दहा हजार रुपये लाच मागितली. चर्चेनंतर नऊ हजारांवर तडजोड झाली. त्यानुसार लाच देण्याचे निश्‍चित झाले होते. सलग सुट्ट्यांनंतर मंगळवारी लाच रक्कम देण्याचेही ठरले; मात्र लाचेची रक्कम नेमकी कुठे द्यायची, हे जाधव याने सांगितले नव्हते. त्यामुळे कारवाई कुठे करायची, याची खात्री तक्रारदार आणि अधिकाऱ्यांनाही नव्हती, मात्र सायंकाळी पाच वाजता कार्यालय सुटल्यावर जाधव याने तक्रारदारांना मार्केट यार्ड येथे बोलविले. याठिकाणी त्याच्यावर लाच घेताना कारवाई करण्यात आली.

त्यानंतर पथकाने जाधव याच्या जाधववाडी येथील घराची झडती घेतली. त्यानंतर सातारा येथील घराची झडती घेण्यासाठी पथक रवाना झाले आहे. पोलिस निरीक्षक आसमा मुल्ला, उपनिरीक्षक संजीव बंबरगेकर यांच्यासह अजय चव्हाण, विकास माने, सचिन पाटील, सुधीर पाटील, विष्णू गुरव यांच्या पथकाने कारवाई केली.

लाचेची मागणी झाल्यास तक्रार द्या

शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, त्यांच्या वतीने एजंट, शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त पैशांची मागणी करणाऱ्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार करता येते. संबंधित तक्रारदारांनी शनिवार पेठेतील कार्यालयात तक्रार द्यावी, असे आवाहन उपअधीक्षक सरदार नाळे यांनी केले.

Back to top button