आजच्या काळात परंपरागत शेती शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही त्यामुळे शेती क्षेत्रात येणाऱ्या शिक्षित तरुणांकडून नवनवीन आधुनिक प्रयोग केले जात आहेत. तरूणांनी केलेल्या या प्रयोगांना यशही मिळत असल्याचे चित्र आहे. काश्मीर सारख्या हिमालयीन प्रदेशात येणाऱ्या केशर शेतीचा असाच प्रयोग पुण्यातील शैलेश मोडक आणि गौतम राठोड या तरुणांनी केला आहे. या दोन तरूणांबरोबरच मुंबई तसेच नंदुरबार जिल्ह्यातील काही तरूणांनी देखील केशर शेतीचे प्रयोग महाराष्ट्रात यशस्वी करून दाखवलेत.
Saffron Farming in Maharashtra
शैलेश मोडक या पुण्यातील तरूणानं अवघ्या 160 चौरस फूट जागेत तब्बल 6 लाखांचं उत्पन्न घेऊन दाखवलय. त्यानं केलेला हा प्रयोग महाराष्ट्रातील शेती क्षेत्राला नवी दिशा देणारा ठरला आहे. यशस्वी केशर शेतीचा हा महाराष्ट्रातील पहिला प्रयोग ठरला आहे.
शैलेश मोडक हा तरूण मुळचा नाशिकचा असला तरी गेल्या काही वर्षांपासून तो पुण्यात स्थायिक आहे. शैलेशचं शिक्षण कॉम्प्युटर सायन्स मध्ये झालयं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यानं काही वर्ष नोकरी देखील केलीय. नोकरी करत असताना शैलेशला अनेकदा विविध देशांमध्ये राहावं लागायचं. परंतु लग्न झाल्यानंतर मात्र शैलेशनं परदेशातील नोकरीऐवजी भारतातच राहणं पसंत केलं. याच दरम्यान त्यानं काही काळ शेतकऱ्यांना परागीभवनासाठी मध पेट्या भाड्यानं देणं आणि इंपोर्ट एक्सपोर्ट यासारखे व्यवसाय करून पाहिलेत. यातूनच त्याला कंटेनर फार्मिंगची कल्पना सूचली… आणि सध्या याच कंटेरनर फार्मिंग मध्ये शैलेशनं जगातील सर्वात महागड पीक म्हणून ओळख असलेलं केशर यशस्वीरित्या पिकवून दाखवलयं.. खालील व्हीडीओच्या माध्यमातून आपण शैलेश मोडक याच्या केशर शेतीचा यशस्वी प्रयोग पाहू शकता.
पुणे जिल्ह्यातील मावळमधील गौतम राठोड यांनी वीस वर्ष स्वतःच गॅरेज चालवले. काही काळानंतर कॅन्सर झाल्याने त्यांना किडनी काढावी लागली. मात्र गौतम यांनी कॅन्सरवर मात करत केसरची शेती व्हर्टीकल फार्मिंग पद्धतीनं केली आहे.
गौतम राठोड यांचे एप्रिल 2023 मध्ये केशर या विषयाची माहिती संकलित करण्याचे काम सुरु होते. त्यात त्यांनी ऑगस्ट महिन्यात काश्मीरमधून केशरचे बियाणे आणले आणि त्याची या ठिकाणी लागवड केली. एका वेगळ्या पद्धतीने केशरचे पिकाची एरोफोनिक पद्धतीने लागवड केली. केवळ हवेच्या माध्यमातून पिकाला जे हवे ते दिले गेले आणि तीन महिन्यात व्हर्टीकल फार्मिंगमध्ये केशरच्या पिकाचे बेडच्या बेड तयार झाले. 120 फूट घराच्या गच्चीवर केसर शेतीसाठी लागणारी रूम तयार केली. त्यात हा प्लांट उभारण्यात आला आहे.