मुंबई | केंद्रीय मोटार वाहन कायदा प्रभावीपणे राज्यात राबवण्याची जबाबदारी राज्याच्या परिवहन विभागाची आहे; मात्र प्रत्यक्षात राज्यातील रस्ते वाहन अपघात आणि मृत्यूची आकडेवारी बघता परिवहन विभाग अंमलबजावणीबाबत गंभीर नसल्याचे दिसते आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे परिवहन विभागाचा कार्यभार आहे. त्यानंतरही परिवहन विभागाचे अपर परिवहन आयुक्त, सहायक परिवहन आयुक्तांसह राज्यभरातील 23 प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. तसेच एकूण पाचशेच्या वर पदे रिक्त आहेत. त्यामुळे विभागाच्या कामकाजावर याचा परिणाम होत आहे. शिवाय सध्याच्या नियुक्त अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कामकाजाचा बोजा पडत असल्याने अधिकाऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
RTO Bharti 2023 Maharashtra
यामध्ये सर्वाधिक गुन्हे मोटार वाहन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि नादुरुस्त वाहनांमुळे झाले आहेत; मात्र त्यानंतरही परिवहन विभागातील अधिकाऱ्यांच्या नियुक्ती होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. परिवहन विभागाचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्याकडून अधिकाऱ्यांच्या पदोन्नती आणि पदस्थापना देण्याच्या दृष्टीने सेवा ज्येष्ठता यादीसह संबंधित प्रस्ताव प्रशासनाला पाठवण्यात आले आहेत, तरी गेल्या अनेक वर्षांपासून या प्रक्रिया का प्रलंबित आहे, असा प्रश्न परिवहन विभागातील अधिकाऱ्यांकडूनच विचारला जातो आहे.
राज्यातील अपघाताची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता तरी अधिकाऱ्यांची पदोन्नती आणि पदस्थापनेकडे लक्ष देऊन अपघात रोखण्याच्या दृष्टीने पावले टाकतील का, असा सवाल परिवहन विभागाकडून उपस्थित केला जात आहे.
रिक्त पदांची संख्या
पद – मंजूर पद – कार्यरत अधिकारी – रिक्त पद
अपर परिवहन आयुक्त – 1 – 0 – 1
सह परिवहन आयुक्त – 6 – 1 – 5
प्रादेशिक परिवहन अधिकारी – 28 – 5 – 23
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी – 60 – 40 – 20
सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी – 174 – 74- 100
मोटार वाहन निरीक्षक – 867 – 551- 316
सहायक मोटार वाहन निरीक्षक – 1098 – 1063 – 35
एकूण – 2235 – 1735 – 500