जिंदा हू मैं..! पूनम पांडेला वाहिलेली श्रध्दांजली आम्ही मागे घेतो! Poonam Pandey
मुंबई | प्रसिध्दीच्या झोतात राहण्यासाठी सतत फालतू माकळचाळे करणाऱ्या पूनम पांडेने यावेळी मात्र कहरच केला. अभिनेत्रीने स्वतःच्या मृत्युचीच खोटी बातमी सर्वत्र पसरवून सर्वांना धक्का दिला. तिच्या या कृत्याने तिच्या चाहत्यांना मात्र अश्रू अनावर झाल्याचे पहायला मिळाले. परंतु पूनम पांडे जिवंत असल्याचे समोर आल्याने तिने हा ड्रामा केवळ जनजागृतीच्या नावाखाली प्रसिध्दी मिळवण्यासाठी केल्याची चर्चा आहे.
पूनम पांडेने सध्या सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. २ फेब्रवारी रोजी तिच्या निधनाचे वृत्त समोर आल्याने अवघे बॉलिवूड हळहळले. तिच्या चाहत्यांच्या पायाखालची तर जमीन सरकली होती. मात्र आज समोर आलेले वृत्त धक्कादायक असून अभिनेत्रीने स्वत: तिचा व्हिडिओ शेअर करत ती निरोगी आणि तंदुरुस्त असल्याचे सांगितले आहे. अभिनेत्रीने स्वत:च तिचे निधन झाल्याची बातमी पसरवली होती. Cervical Cancer या आजाराविषयी जागरुकता पसरवण्यासाठी हे कृत्य केल्याचे तिने स्वत: व्हिडिओ शेअर करत सांगितले आहे.
मृत्यूची बातमी शेअर केल्यानंतर तिने इन्स्टाग्रामवर दोन व्हिडिओ शेअर केले आहेत. अभिनेत्रीने जो पहिला व्हिडिओ शेअर केला आहे त्यात असे म्हटले की, ‘मी जिवंत आहे, सर्व्हायकल कॅन्सरमुळे माझा मृत्यू झालेला नाही. मात्र दुर्दैवाने ही गोष्ट मी त्या शेकडो-हजारो महिलांबद्दल बोलू शकत नाही, ज्यांचा सर्व्हायकल कॅन्सरमुळे मृत्यू झाला आहे. त्यांचा मृत्यू यामुळे झालेला नाही की त्या काही करू शकल्या नाहीत, पण यामुळे की त्यांना माहीतच नाही की काय करायला हवे. मी तुम्हाला हे सांगण्यासाठी आले आहे की, सर्व्हायकल कॅन्सर प्रतिबंध करण्यायोग्य आहे. तुम्हाला केवळ तुमच्या काही चाचण्या करुन घ्याव्या लागतील, HPV लस घ्यावी लागेल. या आजारामुळे कोणाचाही मृत्यू होऊ नये याकरता या सर्व गोष्टी आणि इतरही काही गोष्टी आपण करू शकतो’. https://www.poonampandeyisalive.com/ या नावाच्या वेबसाइटवर तिने सर्व्हायकल कॅन्सरविषयी जागरुकतेची मोहीम नेमकी काय आहे, याबद्दल सांगितले आहे.
पूनम पांडेच्या या आचरटपणामुळे सोशल मिडीयावर मोठा संताप व्यक्त केला जात आहे. तर अनेकांनी तिला खडे बोल सुनावत प्रसिध्दीसाठी स्वतःचा मृत्यु जाहीर करणाऱ्या पूनमचा धिक्कार केला आहे. तिच्या काही चाहत्यांनी मात्र तिच्या जनजागृतीच्या कृत्याचे समर्थन केले असून तिला वाहिलेली श्रध्दांजली मागे घेत असल्याचे म्हणटले आहे.
Poonam Pandey Death: ‘लॉक अप’ फेम पूनम पांडेचे निधन?; अभिनेत्रीच्या अकाली मृत्युने खळबळ
मुंबई | सतत वादाच्या भोवऱ्यात राहणारी बोल्ड अभिनेत्री पुनम पांडेचे निधन (Poonam Pandey Death) झाले. आज (2 फेब्रुवारी) रोजी वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी तिचे निधन झाले. गेल्या कित्येक दिवसांपासून ती गर्भाशयाच्या कॅन्सरशी झुंज देत असल्याचे आता समोर आले आहे. याबाबत पुनम पांडेच्या मॅनेजरने माहिती दिली आहे. परंतु सध्यातरी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसून पूनमचा मृत्यु संशयाच्या भोवऱ्यात आहे.
गुरुवारी रात्री गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने पूनमचे निधन झाले. पूनमच्या मॅनेजरने न्यूज 18 ला याची पुष्टी केली आहे. मॅनेजर म्हणाला की, “तिचे काल रात्री निधन झाले.” तिच्या मृत्यूची बातमी सर्वप्रथम तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आली. यामध्ये लिहिले आहे की, “आजची सकाळ आमच्यासाठी कठीण आहे. अत्यंत दुःखाने कळवावे लागते आहे की, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे आम्ही आमच्या लाडक्या पूनमला गमावले आहे.”
पूनम पांडेच्या हॅण्डलवरून केल्या गेलेल्या पोस्टमध्ये लिहिले गेले आहे की, “जो कोणी तिच्या संपर्कात आला त्याला प्रेम आणि आनंद मिळाला. या दुःखाच्या काळात, आम्ही प्रायव्हसी ठेवण्याची विनंती करतो.” पूनमच्या या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. तिच्या मृत्यूवर चाहत्यांचा विश्वास बसत नाही. पूनमने कधीही सार्वजनिक किंवा खाजगी जागेत तिच्या गर्भाशयाच्या कर्करोगाचा उल्लेख केला नव्हता.
1 फेब्रुवारी रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत 2024-2025 चा केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना घोषणा केली होती की, सरकार गर्भाशयाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी 9 ते 14 वयोगटातील मुलींना लसीकरण करण्यास आवाहन करणार.
पूनम पांडेचे ज्या कॅन्सरमुळे निधन झालं आहे, त्याचं नाव सर्वाइकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाचा कॅन्सर असं आहे. या कॅन्सरची शक्यता महिलांमध्ये अधिक असते. योनीमार्गातून असामान्य रक्तस्राव होणं, दोन मासिक पाळीदरम्यान, लैंगिक संबंधांदरम्यान किंवा रजोनिवृत्तीनंतर योनीमार्गातून असामान्य द्रव स्रवणं, लैंगिक संबंधांदरम्यान खूप वेदना होणं अशी त्याची लक्षणं आहेत. यामु्ळे महिलांनी काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे.
अहवालांनुसार, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा एक धोकादायक आजार आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा जागतिक स्तरावर महिलांमध्ये सर्वात वेगाने वाढणारा कर्करोग आहे, ज्यामुळे दरवर्षी लाखो महिलांचा मृत्यू होतो. भारतात, 18.3% (123,907 प्रकरणे) असा दर आहे. भारतात गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा तिसरा सर्वात सामान्य कर्करोग आहे. अहवालानुसार, 9.1% मृत्यू दर असलेल्या महिलांमध्ये मृत्यूचे हे दुसरे प्रमुख कारण आहे.
पूनम हिने इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. पूनम अनेकदा वादाच्या भोवऱ्यात देखील अडकली होती होती. ‘लॉक अप’ या शोमुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली होती. सोशल मीडियावर देखील पूनम कायम सक्रिय होती. सोशल मीडियावर पूनम हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
पूनम पांडे आणि वाद हे जुनं नातं
पूनम पांडे आणि वाद हे जुनं नातं आहे. तिच्या बेताल वक्तव्यांमुळे ती बऱ्याचदा चर्चेत आली आहे. तिची सर्वात मोठी कॉन्ट्रोव्हर्सी तर 2011 सालच्या क्रिकेट वर्ल्डकपदरम्यान झाली होती. ‘भारताने वर्ल्डकपचा अंतिम सामना जिंकला, तर मी स्ट्रिपिंग करेन, असं तिने जाहीर केलं होतं.’ तिच्या या वक्तव्याची खूप चर्चा झाली, त्यावरून बराच गदारोळही माजला होता, लोकांनी सोशल मीडियावर तिला बरंच ट्रोलही केलं होतं.
त्यानंतरही तिची अशी वक्तव्यं सुरूच होती. यानंतर, 2012 मध्ये, अभिनेता शाहरुख खानची टीम कोलकाता नाईट रायडर्ससाठी चीअर करतानाही तिने असेच बेताल वक्तव्य केलं. केआरके संघ जर यावर्षी आयपीएल ट्राफी जिंकला तर ती प्रेक्षकांसमोर न्यूड होईल, पण नंतर पूनमने तिचा शब्द फिरवला.
पतीच्या परवानगीशिवाय बाहेर पडणंही झालं होतं कठीण
पुनमच्या निधनानंतर आता तिच्या वैवाहिक आयुष्याबाबत बोललं जात आहे. अभिनेत्री असूनही तिला घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागला होता. पुनमने (Poonam Pandey) सॅम बॉम्बे नामक व्यक्तीसोबत संसार थाटला होता. मात्र, त्यांचं लग्न फार काळ टिकू शकलं नाही. सॅम बॉम्बे तिला बेदम मारहाण करायचा, या हिंसाचाराची ती बळी ठरली होती. यामुळे तिला ब्रेन हॅमरेजचा आजार झाला होता. पतीच्या परवानगीशिवाय तिला घराबाहेर पडणंही अवघड झालं होतं.