मुंबई | महाराष्ट्र शिक्षक भरती अंतर्गत पवित्र पोर्टल वर विविध जिल्ह्यांच्या जाहिराती येणे सुरु झाले आहे. राज्यातील एकूण १५६ व्यवस्थापनांच्या तब्बल 7,720 शिक्षकांच्या पदांची जाहिरात शालेय शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलवर दिली आहे. या शिक्षक पदांसाठी शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता असणाऱ्या आणि पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.
राज्यात शिक्षक भरतीसाठी सर्वच व्यवस्थापनांना जाहिरात देण्याची सुविधा पवित्र प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे शिक्षक भरतीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. वाशीम जिल्ह्यातील रिक्त पदांची माहिती पवित्र प्रणालीवर भरण्यात आली असून मान्यता मिळताच पुढील प्रक्रियेला सुरवात होईल, अशी माहिती शिक्षण विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
पवित्र पोर्टल लॉगिन लिंक
Pavitra Portal Shikshak Bharti 2024
‘अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी २०२२’ या परीक्षेत प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी पवित्र प्रणालीमध्ये वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेल्या उमेदवारांना जाहिरातीनुसार ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. संबंधित पात्र उमेदवारांना पात्र असलेल्या पदांसाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळा स्तरावर केंद्रातील अन्य शाळांमधील शिक्षकांना इंग्रजी भाषेच्या अध्यापनाचे तंत्र शिकविण्यासाठी नियुक्त केंद्र शालास्तरावर एक शिक्षक याप्रमाणे इंग्रजीतून शिक्षण झालेल्या उमेदवारांमधून हे पद भरण्यात येणार आहे. परंतु, त्याला मराठी माध्यमाच्या उमेदवारांकडून विरोध दर्शविला जात आहे.
राज्यातील १४ जिल्हा परिषदा, १५ नगरपालिका आणि दोन महानगरपालिका यांच्यासह १२५ खासगी व्यवस्थापन अशा एकूण १५६ व्यवस्थापनाकडून सात हजार ७२० शिक्षकपदाची जाहिरात देण्यात आली आहे. या व्यवस्थापनांकडून पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे. यात मराठी माध्यमाच्या शाळांसाठी सहा हजार ८४५ शिक्षकांच्या पदांच्या भरतीची जाहिरात निघाली आहे. माध्यमनिहाय बिंदूनामावली असल्याने इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी स्वतंत्र जाहिराती असतात.
– सूरज मांढरे, राज्याचे शिक्षण आयुक्त
राज्यातील जिल्हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका यांच्यासह खासगी व्यवस्थापनांमधील शिक्षकांच्या रिक्त पदे भरण्यासाठी शिक्षक भरतीची जाहिरात अधिकृतरीत्या प्रसिद्ध झाल्याने आनंद होत आहे. परंतु, इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना मराठी, सेमी इंग्रजी आणि इंग्रजी माध्यमातील शिक्षक पदांसाठी पात्र केल्याने त्यांना जास्त संधी मिळणार असून, मराठी माध्यमाच्या उमेदवारांवर अन्याय होणार आहे. खासगी संस्थांच्या जाहिराती पुढील टप्प्यात येणार असल्याने शिक्षक भरती फसवी होणार की काय, असा प्रश्न पडत आहे.