राज्यात ढगाळ व कोरड्या हवामानासह कमाल तापमानात चढ-उतार राहण्याची शक्यता | October Weather Forecast
मुंबई | ऑक्टोबर हीटच्या तडाख्यामुळे मुंबईसह कोकणवासिय हैराण झाले आहेत. उर्वरित महाराष्ट्रात मात्र कमाल तापमानात घट होत असल्याचे चित्र आहे. आज (ता. 23) राज्यात ढगाळ व कोरड्या हवामानासह कमाल तापमानात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे (ईशान्य मॉन्सून) दाखल झाले असताना राज्यात कमाल तापमानात चढ-उतार होत आहेत. बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्रामुळे पूर्व किनारपट्टीवर ढग वाढले आहेत. तर शनिवारी (ता. 21) राज्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.
सध्याच्या ढगाळ हवामानामुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात काहीसी घट झाली आहे. तर रविवारी (ता. 22) सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये मुंबईतील सांताक्रुझ येथे राज्यातील उच्चांकी 37.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. डहाणू येथे तापमान 36 अंशांवर होते. तर आज राज्यात कोरड्या हवामानसह, तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
‘तेज’ चक्रीवादळाची तिव्रता वाढली
अरबी समुद्रामधील ‘तेज’ चक्रीवादळ रविवारी (ता.22) अतितीव्र झाले आहे. हे चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनाऱ्यापासून दूर येमेन आणि ओमानकडे सरकत आहे. उद्यापर्यंत हे चक्रीवादळ (ता. 24) येमेनच्या अल घाईदाह जवळ किनारपट्टीला धडकण्याचे संकेत आहेत. तर बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असून, वायव्येकडे सरकणारी ही वादळी प्रणाली दिशा बदलून पश्चिम बंगाल आणि बांग्लादेश कडे सरकण्याची शक्यता आहे.