मुंबई | भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांची नाराजी दूर करण्यात भाजप नेतृत्वाला यश आले आहे. निलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा घेतलेला निर्णय एका दिवसात मागे घेतला आहे. सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, निलेश राणे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात झालेल्या बैठकीनंतर निलेश राणे यांची नाराजी दूर झाली आहे.
याबाबतची माहिती, रवींद्र चव्हाण यांनी मीडियाला दिली आहे. सिंधुदुर्गात निलेश राणे यांच्या नेतृत्वात पक्षाचा झंझावात कायम राहील, असे सांगतानाच निलेश राणे यांनी जो मुद्दा मांडला त्याची दखल घेण्यात आल्याचेही रवींद्र चव्हाण यांनी मीडियाशी संवाद साधताना सांगितले.
निलेश राणे यांनी काल तडकाफडकी राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता. तशा आशयाचे ट्विट करून त्यांनी ही माहिती दिली होती. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न झाले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही त्यांची समजूत घातली. पण निलेश राणे आपल्या निर्णयावर ठाम राहिले.
आज देवेंद्र फडणवीस यांनी निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण या दोन्ही नेत्यांना सागर बंगल्यावर बोलावून घेतले. यावेळी निलेश राणे यांची समजूत काढून त्यांना पुन्हा पक्षात सक्रिय होण्यास सांगण्यात आले. त्यामुळे निलेश राणे यांनीही आपला राजीनामा मागे घेत पक्षात सक्रिय होणार असल्याचे स्पष्ट केले.
यामुळे राजकारणातून निवृत्त होण्याचा घेतला होता निर्णय
ज्यावेळी छोटा कार्यकर्ता पक्षात काम करत असतो. त्यावेळी त्याच्या अडचणी सुद्धा वरिष्ठ नेत्यांनी जाणून घेतल्या पाहिजे, हे निलेश यांचे म्हणणे होते. आम्ही आमदार आणि खासदारकीच्या निवडणुकांचाच विचार करत असतो. पण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत छोट्या कार्यकर्त्यांना लढायचे असते. त्यांचा विचार आमच्याकडून पाहिजे तसा होत नाही. छोट्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घ्यायला हव्यात. त्या न जाणून घेतल्याने निलेश राणे नाराज होते. ते कार्यकर्त्यांवर प्रेम करणारे नेते आहेत. कार्यकर्त्यांच्या भावना नेते जाणून घेत नसल्याने त्यांनी टोकाचा निर्णय घेतला, असे चव्हाण म्हणाले.