Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश! जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य!

0
37

मुंबई | राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या जवळपास सर्व मागण्या मान्य केल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं आहे. सरकारने मध्यरात्रीच याबाबतचे अध्यादेश देखील काढले आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे.

राज्य सरकारने जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य करताच नवी मुंबईत मराठा आंदोलकांनी मध्यरात्रीच जल्लोष सुरू केला होता. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं, तसेच आंदोलकांवरील गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत, यासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या ५ महिन्यांपासून आंदोलन करीत होते. 

मनोज जरांगे पाटील यांनी रात्री दोन वाजता पत्रकार परिषद घेतली. आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार आहेत. जरांगे पाटलांची विजयी सभा आज वाशीमध्ये पार पडणार आहे. मराठा बांधवांकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांची वाशीत होणाऱ्या विजयी सभेत एक-दोन नव्हे तर तब्बल सात जेसीबीच्या माध्यमातून जरांगे पाटील यांच्यांवर फुलांची उधळण करण्यात येणार आहे.

मनोज जरांगेंना सुधारित अध्यादेश सुपूर्द करण्यात आला असून त्या अध्यादेशामध्ये सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचा समावेश करण्यात आलेला आहे. यासोबत मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, सरकारने सगेसोयरेबाबतचा जीआर दिला आहे. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्याबाबत आदेश दिले आहेत. तसेच वंशावळीसाठी तालुका स्तरावर समिती नेमली. आरक्षणावर अधिवेशनात कायदा येणार.