News

महाविकास आघाडीच्या कोल्हापूर लोकसभेच्या उमेदवारावर आज शिक्कामोर्तब? तर हातकणंगलेत राजू शेट्टींना पाठिंबा? Loksabha Election 2024

कोल्हापूर | राज्यातील सत्तांतरामुळे सर्वच मतदार संघातील निवडणुकांचे वारे बदलले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर आणि हातकणंगले मतदार संघात महाविकास आघाडीच्या बाबतीत हिच स्थिती आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून उमेदवारी कोणाला द्यायची यासंदर्भात सध्या चाचपणी सुरू आहे.

याच पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील इच्छुक उमेदवारांची बैठक पार पडत आहे. कोल्हापूर लोकसभा मतदार संघासाठी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख व उपनेते संजय पवार यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. तर हातकणंगले मतदारसंघातून महाविकास आघाडी राजू शेट्टी यांना पाठिंबा देण्याच्या विचारात असल्याची चर्चा आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये झालेल्या बंडामध्ये महाविकास आघाडीची ताकद कमी झाली. विशेषतः कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात असलेले दोन्ही विद्यमान खासदार हे ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटांसोबत महायुतीमध्ये सामील झाले आहेत. यामुळे आगामी लोकसभा आणि हातकणंगले मतदारसंघात उमेदवारी कोणाला द्यायची हा प्रश्न महाविकास आघाडीसमोर उपस्थित झाला आहे.

महाविकास आघाडी मधील तिन्ही प्रमुख पक्षानी या दोन्ही मतदारसंघावर आपला दावा सांगितला आहे. मात्र विद्यमान आमदार हे शिवसेनेचे असल्याने दोन्ही जागांवर आमचाच उमेदवार असेल अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाकडून व्यक्त केली जात आहे. असे असले तरी जागा वाटपाच्या बैठकीत हातकणंगलेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तर कोल्हापूरची जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता आहे.

याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इच्छुकांची मातोश्रीवर बैठक घेण्यात येत आहे. या बैठकीला कोल्हापूर मतदारसंघातून इच्छुक असलेले जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, माजी आमदार संजयबाबा घाटगे आणि गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके हे उपस्थित असणार आहेत. तर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रत्येक उमेदवाराची मतदार संघात असलेली ताकद आणि इतर चर्चा होणार आहे.

राजू शेट्टीची भूमिका काय?

जागा वाटपात हातकणंगले मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये झालेल्या बंडा नंतर हातकणंगले मतदारसंघातील महाविकास आघाडीची ताकद कमी झाली आहे. त्यामुळे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत महाविकास आघाडी असल्याचे बोलले जात आहे. राजू शेट्टी यांनी मात्र यावर अद्याप कोणतेही भूमिका जाहीर केलेली नाही.

Back to top button